Sangali News: बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त
पोलिसाच्या घरातच नोटांची छपाई, पाच जणांना अटक
सांगली : कोल्हापूरमध्ये छपाई केलेल्या बनावट नोटा मिरजेत खपविणाऱ्या टोळीला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी जेरबंद केले. केवळ 24 तासात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणून तब्बल 98 लाख, 43 हजार, 500 ऊपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याशिवाय नोटा छपाईचे जापनीज टेक्नॉलॉजीचे मशिन, कागदाचे बंडल, रंग आदी साहित्यासह गुह्यातील आलिशान चारचाकी असा एकूण 1 कोटी, 11 लाख, 6 हजार 900 ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोल्हापूर जिह्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात हवालदार असलेल्या कर्मचाऱ्याच्या घरातच नोटा छपाईचा कारखाना सुऊ असल्याची माहिती समोर आल्याचे सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांना दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संशयित सुप्रित काडाप्पा देसाई (वय 22, रा. गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (वय 33, रा. लोकमान्यनगर, कोरोची, ता. हातकणंगले), हवालदार अब्रार आदम इनामदार (वय 44, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय 40, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि सिद्धेश जगदिश म्हात्रे (वय 38, रा. रिद्ध गार्डन, ए. के. वैद्य मार्ग, मालाड पूर्व, मुंबई) अशा पाचजणांचा समावेश आहे.
सर्व संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर रस्त्यावरील अंकली ब्रिजजवळ एक व्यक्ती बनावट नोटा खपविण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार गुरुवारी पोलीस उपनिरीक्षक ऊपाली गायकवाड यांच्यासह पथकाने तेथे सापळा लावून संशयित सुप्रित देसाईला पकडले. त्याच्याकडून 500 ऊपये चलनाच्या एकूण 42 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता तपासातून समोर आली. संशयित सुप्रित देसाईकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने राहुल जाधवकडून या नोटा आणल्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी हातकणंगलेतून राहुल जाधवला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर नोटा छपाईपासून वितरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. राहुल जाधव हा ऊईकर कॉलनी येथे शाहूपूरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अब्रार मकानदार याच्या मालकीच्या जागेत सिद्धलक्ष्मी चहा शॉपमध्ये नोटांची छपाई करण्याचा कारखाना चालवित असल्याचे तपासातून समोर आले.
म. गांधी चौकी पोलिसांनी कोल्हापूर येथील पोलिसांच्या मदतीने या कारखान्यावर छापा टाकला. या कारखान्यातून पाचशे ऊपये मूल्यांच्या 68 नोटांप्रमाणे 34 हजार ऊपयांच्या नोटांसह 1 लाख, सात हजार सहाशे ऊपयांचे बनावट नोटा छपाईचा जापनीज प्रिंटर, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले. पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर यातील संशयित हवालदार अब्रार मकानदार, नरेंद्र शिंदे व सिद्धेश जगदिश म्हात्रे हे तिघेजण विनानंबर प्लेटच्या इनोव्हा कारमधून पळून जात होते.
पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा काढून पुणे-बेंगळूर महामार्गावरील पेठनाका ते कासेगांव दरम्यान त्यांना पकडले. त्यांच्या चारचाकीत 97 लाख, 64 हजार पाचशे ऊपये म्हणजेच 500 ऊपये मूल्यांच्या 19 हजार, 535 बनावट नोटा व दोनशे ऊपये दराच्या 85 हजार आठशे ऊपये म्हणजेच 200 ऊपयांच्या 429 नोटा अशा एकूण 98 लाख, 53 हजार, तीनशे ऊपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
पोलिसांनी या गुह्यातील बनावट नोटांसह छापाईची उपकरणे व चारचाकी असा एकूण 1 कोटी, 11 लाख, 6 हजार, 900 ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नोटा खपविण्यासाठी लॉजवर आसरा दरम्यान, सुप्रित देसाई याला पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. मुख्य सूत्रधार राहुल जाधव हाच नोटा छपाई करीत होता.
तर सुप्रित व अन्य संशयित नोटा खपविण्याचे काम करीत होते. 1500 ऊपयांच्या नोटा खपविल्या की पाचशे ऊपये मोबदला, अशा पद्धतीने हे रॅकेट सुरू होते. संशयित नोटा खपविण्यासाठी मिरजेत आले होते त्यांनी एका लॉजवर आसरा घेतला होता. मात्र सुप्रित हा पोलिसांच्या जाळ्यात सापडताच त्याचे अन्य साथीदार पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, गांधी चौकी पोलिसांनी केवळ 24 तासात रॅकेटचा पर्दाफाश कऊन सर्व संशयितांना बेड्या ठोकल्या.
भारतीय नोटांची हुबेहूब नक्कल बनावट नोटा छपाईतील मास्टरमाईंड टोळीने परदेशी मशिनरींचा आधार घेतला होता. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा हुबेहूब भारतीय चलनासारख्या दिसतात. प्रत्येक नोटांवर सिरियल नंबरही वेगवेगळा असल्याने त्या लवकर ओळखून येत नाहीत.
कागदाचा आकार, जाडी, रंग व मध्य भागातील हिरव्या रंगाचा शंभर बाँड मार्क, महात्मा गांधींच्या फोटोचा वॉटरमार्क या नोटांमध्ये हुबेहूब दिसून येतो. पोलिसही या बनावट नोटांचे बंडल पाहून सुरूवातीला चक्रावले होते.
या नोटा खऱ्या की खोट्या हे कळतच नव्हते. मात्र, प्रत्यक्ष बनावट नोटांच्या कारखान्यावरच छापा टाकून यंत्रसामुग्री हाती लागल्याने या बनावट नोटांचा सिलसिला उघडकीस आला आहे. गांधी चौकी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जिह्यातील बनावट नोटा प्रकरणाची ही सर्वात मोठी कारवाई केल्याने प्रशासनाचे अभिनंदन होत आहे.