दरोडासारख्या प्रकरणातील पोलिसांची गय नाही : परमेश्वर
बेंगळूर : दरोडासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्या पोलिसांची गय न करता कारवाई केली जात आहे. एफआयआर दाखल होताच त्यांना सेवेतून बडतर्फ केले जात आहे, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले. दावणगेरे येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बेंगळूरमधील 7.11 कोटी रुपये दरोडा प्रकरण आणि कोलार जिल्ह्यातील मालूर येथील प्रकरणात दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दावणगेरे प्रकरणासंबंधी प्रोबेशनरी पीएसआयलाही बडतर्फ तर एकाला निलंबित केले आहे. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
14,000 कॉन्स्टेबल पदे रिक्त
राज्यात 14,000 हून अधिक पोलीस कॉन्स्टेबल पदे रिक्त आहेत. अनेक कारणांमुळे नेमणूक प्रक्रिया राबविणे शक्य झाले नाही. यापैकी 3,600 कॉन्स्टेबल पदे भरतीला संमती मिळाली आहे. त्याचप्रमाणे 600 पोलीस उपनिरीक्षकांची नेमणूक प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.