विषारी उद्यान
उद्याने, बागा आणि बगीचे ही स्थाने आनंदाची आणि उत्साहवर्धन करणारी असतात हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. कित्येकदा शीण घालविण्यासाठी आणि प्रफुल्लित होण्यासाठी आपण हेतुपुरस्सर उद्याने किंवा पुष्पवाटिकांमध्ये जातो. तेथे तासभर फिरुन किंवा बसून आपण ताण घालवितो. पहाटे किंवा संध्याकाळी उद्यानांमध्ये आणि वाटिकांमध्ये जाणे हा कित्येकांचा दिनक्रमच असतो. मात्र, या जगात एक उद्यान असे आहे की, जेथे गेल्यानंतर कित्येक लोक बेशुद्ध पडतात. कित्येकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात. त्यामुळे या स्थानाचा ‘विषारी उद्यान’ असा उल्लेख केला जातो. या उद्यानात चक्क विषारी वृक्ष आणि वनस्पती आहेत.
हे उद्यान ब्रिटनमधील नॉर्थम्बरलँड येथे आहे. त्याचे नाव ‘अॅलन्वीक पॉयझन गार्डन’ असे आहे. या वाटिकेत 100 अतिविषारी वृक्ष आहेत. विशेष म्हणजे हे वृक्ष या वाटिकेत अपोआप उगवलेले नाहीत. तर त्यांची लागवड करण्यात आलेली आहे. विषारी वृक्षांची लागवड करण्यामागचा हेतू या वृक्षांचा अभ्यास करणे हा आहे. मात्र, या वृक्षांच्या संपर्कात कोणी आल्यास त्याला प्रकृतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, असा अनेकांचा अनुभव आहे. तरीही हे वृक्ष तेथे राखलेले आहेत.
या विषारी उद्यानाची निर्मिती 2005 मध्ये करण्यात आली आहे. विषारी वृक्षांसंबंधी लोकांचे प्रबोधक करणे हा या निर्मितीमागचा हेतू होता. लोकांनी अशा वृक्षांपासून किंवा रोपांपासून दूर रहावे, यासाठी हे प्रबोधक करण्यात येते. त्यामुळे कोणीही या वाटिकेत आल्यास त्याला प्रथम प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून विविध सूचना केल्या जातात. या उद्यानात कसे फिरायचे हे स्पष्ट केले जाते. तरीही काही लोक या सूचना पाळायला विसरतात किंवा हेतुपुरस्सर पाळत नाहीत. अशावेळी त्यांना प्रकृतीच्या समस्या निर्माण होतात. काहीजण तर बेशुद्धच होतात.