बाहेरील राज्यातून येणाऱ्या विषारी माशांवर कारवाई करा, आयजीएमला सर्जन द्या ! पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हयातील नागरिकांचे निवेदन
05:45 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement
कोल्हापूर प्रतिनिधी
पंचगंगा प्रदूषणाबाबत घालण्यात आलेले निर्बंध उठवण्यासह बाहेरुन येणाऱ्या विषारी मास्याबाबत कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने केली. इचलकरंजीतील नागरिकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अडचणीबाबत तक्रार करत या रुग्णालयात सर्जन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यातील नागरिकांनी निवेदन देत समस्या मांडल्या.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिह्यातील विविध प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील नागरिकांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत समस्या मांडल्या. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने मच्छिमारांच्या अडचणीबाबत चर्चा केली. पंचगंगा प्रदूषणाबाबत घातलेले निर्बंध मच्छीमार यांना त्रासदायक ठरणार नाहीत. तसेच मच्छीमार मृत्यू बाबत पंचनामे करू असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. जिह्यात बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या विषारी मास्यांवर कारवाईच्या मागणीवर तातडीने तपासणीचे निर्देश देवू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील विविध अडचणीबाबत इचलकरंजीतील नागरिकांनी तक्रार केली. या रुग्णालयात स्टाफ कमी असल्याने रुग्णांवर वेळेवर शस्त्रक्रिया होत नाहीत किंवा उपचार होत नाहीत. या रुग्णालयाला सर्जन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. पालकमंत्री मुश्रीफ यांनी औषध आणि पदभरतीबाबत प्रश्न मार्गी लावा. तसेच जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयातील अडचणी बैठक घेवून मार्गी लावाव्यात असे निर्देश त्यांनी दिले.
कागल नगरपरिषद हद्दीतील 1326, 1327, 1328, 1329, 1330 या जागेचा सिटी सर्व्हे करुन प्रॉपर्टी कार्ड वाटपबाबत चर्चा झाली. पिंपळगाव खुर्द, ता. कागल येथील गट क्रमांक 399 मधील 1.00.00 हे. आर जमीन विरशैव लिंगायत समाजासाठी दफनभूमी करीता मिळण्याबाबत ग्रामस्थांच्या निवेदनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी केल्या. ओबीसी बहुजन पार्टीने ओबीसी वसतीगृहाच्या समस्यांबाबत निवेदन दिले. यावेळी मुश्रीफ यांनी तत्काळ कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्षा शिंगण आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.
कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
प्रा.शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन बिंदू चौक विद्रूपीकरण विरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.अन्यथा आंबेडकरी समाज संपूर्ण जिल्हयात रस्त्यावर आंदोलन करेल असा इशारा दिला.यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना लक्ष घालण्याची सूचना केली.
Advertisement
Advertisement