52 तोळे सोने घेऊन कारागिराचा पोबारा
कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सराफी व्यवसायिकांसह ग्राहकांची साडेएकतीस लाख रुपयांची फसवणूक
वार्ताहर/ एकंबे
शहरातील बाजारपेठ परिसरात सोन्याचे दागिने घडविणारा कारागीर गोपाल सुबोध सामुई याने सराफी व्यवसायिकांसह ग्राहकांचे सुमारे 52 तोळे सोने व दोन लाख रुपये रोख असा एकूण 31 लाख 52 हजार 600 रुपयांचा ऐवज घेऊन सहकुटुंब पोबारा केला आहे. याप्रकरणी एका सराफी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल सुबोध सामुई (वय 38, रा. मूळ शामसुंदरपुर, तालुका घाटाल, जिल्हा पश्चिम मिदनापूर, राज्य पश्चिम बंगाल राज्य) हा गेली 10 वर्षे कोरेगावात वास्तव्यास होता. हल्ली नगरपंचायत कार्यालयासमोर एका इमारतीत भाडय़ाने घर घेऊन सहकुटुंब राहत होता. तो सोन्याचे दागिने घडविणारा कारागीर असल्याने त्याच्यावर सराफी व्यावसायिक व ग्राहकांचा मोठा विश्वास होता.
व्यापारीपेठेत असलेल्या मगर ज्वेलर्सचे मालक विशाल आकाराम मगर हे देखील अनेक वर्ष सामुई याच्याकडून सोन्याचे दागिने तयार करून घेत होते. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सामुई हा मगर ज्वेलर्स दुकानात गेला होता. त्यावेळी विशाल मगर यांनी त्यास 15-तोळे वजनाचा चोख सोन्याचा गोळा व दोन लाख रुपयांची रक्कम दागिने करण्यासाठी दिली होती.
दिनांक 18 फेब्रुवारीपर्यंत दागिने तयार करून देण्याचा शब्द त्याने दिला होता. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विशाल मगर यांचे बंधू राहुल यांनी सामुई याच्या मोबाईलवर कॉल करून दागिन्यांबाबत विचारणा केली असता, त्यावेळी त्याने मुलाला दवाखान्यात घेऊन चाललो आहे, आल्यावर तुमचे दागिने देतो असे सांगितले. तासाभरानंतर मगर यांनी पुन्हा मोबाईलवर कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे समजले. त्यानंतर सामुई याचा मेहुणा सुमोन व पत्नी शिवली यांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता ते देखील बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मगर यांनी सामुई याचे घरी गाठले, मात्र ते घर बंद होते. शेजारच्या लोकांनी गोपाल सामुई व त्याचे कुटुंबातील सदस्य निघून गेले असल्याचे सांगितले. मगर यांना व्यापारी पेठेत चर्चे दरम्यान समजले की, शहरातील अन्य ग्राहकांकडून देखील त्याने मोठय़ा प्रमाणावर सोने दागिने तयार करण्यासाठी नेले आहे, मात्र सोने अथवा दागिने परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात गोपाल सामुई याच्या विरोधात 31 लाख 52 हजार 700 रुपयांची आपली अन्य ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करत आहेत.