उत्कंठा, हुरहुर, चुरस अन् जल्लोष...
पहिल्या बारा फेरीत लाटकरांची आघाडी, नंतर मात्र क्षीरसागरांचीच बाजी : क्षणाक्षणाला धाकधुक अन् उत्सुकता
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी दहाही मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी चुरशीने मतदान झाले. संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या उत्तर मतदारसंघात शेवटपर्यंत चुरस पहायला मिळाली. लोकांनी स्वंयस्फूर्तनि मतदान केल्याने यंदा उत्तरच्या मतदानाचा टक्काही वाढला होता. आज प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर शेवटपर्यंत उत्कंठा, हुरहुर, चुरस अन् धाकधुक पहायला मिळाली.
शनिवारी सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच नागरिकांमध्ये धाकधुक... हुरहुर अन् कोण आघाडीवर, पिछाडीवर, कोणाचे पारडे जड याचीच चर्चा सुरू होती. जसजशी निकालाची आकडेवारी समोर येईल तसतशी धाकधुक अन् उत्सुकता वाढत जात होती. सोशल मीडियावरून निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट्स घेतले जात होते.
पहिल्या फेरीत काँग्रेस, महाविकास पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना 7014 तर महायुती शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांना 4572 मते पडल्याची आकडेवारी समोर आली. पहिल्या फेरीत लाटकर यांनी 2439 मतांचे लीड घेतले. याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. यानंतर दुसरऱ्या फेरीतही लाटकर यांना 1708 चे लीड मिळाले. तिसऱ्या फेरीतही लाटकर यांनी 3834 मतांची आघाडी घेतली. चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या फेरीपर्यंत लाटकरच आघाडीवर होते. यामुळे लाटकर समर्थकांनी जल्लोषाला सुरूवात केली. येथून पुढच्या फेरीतही मताधिक्य कायम राहून लाटकरच विजयी होतील अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती.
नवव्या फेरीनंतर मात्र, लाटकरांचे लीड कमी होत गेले. नवव्या फेरीत केवळ 1595 चे आघाडी राहीली. दहाव्या, अकराव्या फेरीत लीड कमी होत गेले. बाराव्या फेरीत केवळ 273 चे लीड राहीले. यानंतर राजेश लाटकर यांचे पारडे जड होत गेले. पंधराव्या फेरीनंतर राजेश क्षीरसागर यांनी मुसंडी मारत 10 हजार 804 मतांची आघाडी घेतली. सोळाव्या, सतराव्या फेरीतही राजेश क्षीरसागर यांना आघाडी मिळत गेली. 18 व्या फेरीत तर क्षीरसागर यांनी लाटकर यांना मागे टाकत 20 हजार 669 मतांची आघाडी घेतली.
यानंतर राजेश क्षीरसागर यांनी शेवटपर्यंत आघाडी घेत अखेर 23 व्या फेरीअखेर 29 हजार 563 मतांनी विजय मिळवल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषाला सुरूवात केली. कार्यकर्त्यांनी शनिवार पेठ येथील कार्यालयासमोर जमायला सुरूवात केली. राजेश क्षीरसागर, आदील फरास, ऋतुराज क्षीरसागर, कृष्णराज महाडिक यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत गुलालाची उधळण केली.
दसरा चौकात सकाळीच झळकले बोर्ड
एकीकडे पहील्या टप्प्यात लाटकर आघाडीवर असताना दुसरीकडे दसरा चौकात क्षीरसागर समर्थकांनी क्षीरसागर यांच्या विजयाचे फलक लावण्यास सुरूवात केली. लाटकरांचे लीड वाढेल असे वाटत असतानाच बाराव्या फेरीनंतर क्षीरसागर यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. व विजयावर शिक्कामोर्तबही केले. मात्र, सकाळीच क्षीरसागर यांच्या विजयाची झळकलेले फलक चर्चेचा विषय बनले होते.
कुकरवर असाही राग
क्षीरसागर यांचा विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आपला आनंदरूपी राग कुकरवर काढला. गल्लीच्या कोपऱ्याकोपऱ्यावर कार्यकत्यांनी कुकर रस्त्यावर आपटून आनंद व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांनी दुचाकीला कुकर अडकवुन फरफटत रॅली काढली. लाटकर यांचे चिन्ह कुकर असल्याने क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी कुकरवर राग काढला.
लॉकडाऊन सदृष्य स्थिती
रमणमळा येथील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजता सुरू झाली. शहरातील चौका-चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. महावीर कॉलेज चौक ते पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंतच मार्गावर सर्वच वाहनांना प्रवेशबंदी केल्यामुळे रस्ता ओस पडला होता. शासकीय अधिकारी पत्रकार व पोलीसाखेरीज रस्त्यावर कोणीच नसल्याने लॉकडाऊन सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
सकाळपासून चर्चा एकच.. कोण आघाडीवर?
मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासून अनेक जण कोण लीड घेत आहे? कोण आघाडीवर आहे? याचीच माहिती घेण्यात व्यस्त होते. दैनंदिन कामासह निकाल काय लागतो, याच्या अपडेटसाठी प्रत्येक जण धडपडत होता. काही उत्साही कार्यकर्ते रमणमळा येथील शासकीय गोदाम येथे मतमोजणीच्या केंद्राजवळ आले, पण त्यांना पोलिसांनी हटकून लावले.
महिलांसह मुले टिव्हीसमोर
निवडणुकीत प्रचारासाठी महिलांसह लहानांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. मतमोजणी दिवशीही महिलांनी घरातील कामे आटोपून मतदानाचे अपडेट्स पाहण्यासाठी टिव्हीसमोर बसणे पसंद केले. मुलेही निकालाचे अपडेट्स मोबाईलवरून घेत होती.