पंतप्रधान 3 एप्रिलपासून थायलंड, श्रीलंका दौऱ्यावर
बँकॉकमधील बिम्सटेक शिखर परिषदेत सहभागी होणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ते 6 एप्रिलदरम्यान थायलंड आणि श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर जातील. थायलंडचे पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 3-4 एप्रिल रोजी सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बँकॉकला भेट देतील. 4 एप्रिल रोजी होणाऱ्या या शिखर परिषदेचे आयोजन थायलंड हा देश करत आहे. पंतप्रधान मोदींचा हा थायलंडचा तिसरा दौरा असेल. थायलंड दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या निमंत्रणावरून 4 ते 6 एप्रिल दरम्यान श्रीलंकेला भेट देतील.
द्विपक्षीय आघाडीवर पंतप्रधान मोदी 3 एप्रिल रोजी पंतप्रधान शिनावात्रा यांची भेट घेतील. या बैठकीत विद्यमान सहकार्याचा आढावा घेण्यासोबतच दोन्ही देशांमधील भविष्यातील भागीदारीसाठी रोडमॅपवर चर्चा केली जाईल. श्रीलंका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती दिसानायके यांच्याशी चर्चा करतील. उच्चस्तरीय चर्चेव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी वरिष्ठ मान्यवर आणि राजकीय नेत्यांना भेटतील. ते अनुराधापुरा येथे भेट देत भारताच्या निधीतून सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.