पंतप्रधानांचा कार्यक्रम पालघरात...महामार्ग आडवला कोल्हापूरात; प्रशासनाचा अजब कारभार
कोल्हापूर पोलीस आणि वाहतूक नियंत्रणाचा अजब कारभार आज कोल्हापूरात पहायला मिळाला. मुंबई पालघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज कार्यक्रम होत असल्याचं कारण सांगून पुणे- बेंगलोर महामार्गावरील अवजड वाहतूक कागल चेकपोस्ट नाक्याजवळ अडवण्यात आली आहेत. यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहतूक दारांचे हाल होत असून महामार्गावर थांबलेल्या असंख्य ट्रकमुळे वाहतूक तुंबली होती.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचे भूमीपूजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला हजारो लोक जाणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता होती. ही वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुणे- बेंगलोर महामार्गावरील बेळगावहून पुण्याला जाणारी अवजड वाहतूक कागल येथील नवीन चेक पोस्ट नाक्यावर रोखण्यात आली आहेत.
दरम्यान, अशा प्रकारची अडवणूक करण्यापुर्वी मालवाहतूक दारांना कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना देण्यात आली नसल्याने ट्रकचालक जागच्या जागी थांबले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्यांना पुर्वसुचना दिली असती तर ते कुठेतर माग थांबले असते. अशा तक्रारी मालवाहतूकदार आणि ट्रक ड्राय़व्हर यांनी केली आहे.