पंतप्रधान मोदींची जागतिक नेत्यांशी चर्चा
इटलीतील जी-7 शिखर परिषदेत सहभाग
वृत्तसंस्था/ अपुलिया, रोम
50 व्या जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीत आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी शुक्रवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार करत हात जोडून शुभेच्छा दिल्या. यानंतर मोदींनी व्हॅटिकन सिटीचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली. रशिया-युव्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांची युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही एक द्विपक्षीय बैठक झाली. तसेच जी-7 आउटरीच बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित होते.
इटलीतील अपुलिया शहरात 13 ते 15 जूनदरम्यान 50 व्या जी-7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने अमेरिका-ब्रिटनसह सर्व संबंधित देशांचे राष्ट्रप्रमुख एकवटले आहेत. या परिषदेसाठी यजमान इटलीने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित केले आहे. त्यानुसार, सलग पाचव्यांदा पंतप्रधान मोदी जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी भारतातून रवाना झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता ते इटलीला पोहोचले. तेथील राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे दिमाखात स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. दोघांशीही जी-7 च्या बॅनरखाली द्विपक्षीय बैठकही घेतली. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी त्यांनी संरक्षण, आण्विक, अंतराळ, डिजिटल तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. मोदी-मॅक्रॉन यांनी जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा केली. तसेच युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशीही संवाद साधला. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर मोदींनी झेलेन्स्की यांची भेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी गेल्यावषी दोन्ही नेत्यांनी जपानमध्ये झालेल्या जी-7 शिखर परिषदेत भेट घेतली होती.
युद्धावर चर्चेतून तोडगा काढा : पंतप्रधान मोदी
रशिया-युव्रेन युद्धादरम्यान, पंतप्रधान मोदींनी जी-7 शिखर परिषदेच्या बाजूला युव्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युद्धाबाबत भारताच्या भूमिकेचा पुनऊच्चार केला. कोणताही वाद मुत्सद्दीपणा आणि संवादातूनच सोडवला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे
मॅक्रॉन-मेलोनी यांच्यात वाद
जी-7 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात वाद झाला. मॅक्रॉन यांनी संयुक्त निवेदनात गर्भपात अधिकारांचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण मेलोनी यांनी हा मुद्दा मांडण्यास नकार दिला. ‘मॅक्रॉन यांनी जी-7 ला निवडणुकीच्या राजकारणासाठी व्यासपीठ बनवू नये’ असे मेलोनी म्हणाल्या. मेलोनींच्या या वक्तव्यावर मॅक्रॉन संतापले. यावर पत्रकारांशी संवाद साधताना मॅक्रॉन यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. ‘महिलांप्रती येथे संवेदनशीलता दिसत नाही. परिषदेत मांडलेला गर्भपाताचा संदर्भ काढून टाकण्यात आला हे अत्यंत वाईट आहे’ असे ते म्हणाले. वास्तविक, या महिन्याच्या अखेरीस फ्रान्समध्ये निवडणुका आहेत. मॅक्रॉन सरकारने मार्चमध्ये गर्भपाताचा अधिकार घटनात्मक केला.
‘एआय’ हे मोठे आव्हान : मेलोनी
आम्ही जी-7 शिखर परिषदेसाठी अपुलिया शहराची निवड केली कारण हे शहर पाश्चात्य आणि पूर्वेकडील देशांमधील संवादाचे व्यासपीठ आहे. आमची आउटरीच सत्रे यावेळी जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या समस्यांचे निराकरण करतात. यापैकी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रथम क्रमांक येतो. ‘एआय’ हे तंत्रज्ञान जगात विकासाच्या नवीन संधी उपलब्ध करून देते. मात्र, त्यात अनेक धोकादायक आव्हानेही आहेत, असे मेलोनी यांनी नमूद केले.