महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशियन राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधान मोदींची चर्चा

06:08 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

द्विपक्षीय धोरणासह विविध जागतिक मुद्यांचा आढावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. “रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी आपली चांगली चर्चा झाली. त्यादरम्यान दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक भागिदारीविषयक भविष्यकालीन आराखडा तयार करण्याचेही मान्य करण्यात आले”, असे पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले. तसेच रशियाला देण्यात आलेल्या ब्रिक्स अध्यक्षपदासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही द्वयींमध्ये चर्चा झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी सायंकाळी स्पष्ट केले.

पुतिन आणि मोदी या दोन्ही नेत्यांनी रशिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्यांचा आढावा घेतला. त्यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय घडामोडींचा आढावा घेत भारत-रशिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी भविष्यातील रोडमॅप विकसित करण्यास सहमती दर्शविल्याचे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना 2024 मध्ये ब्रिक्स अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. दोन्ही नेत्यांनी भविष्यातही संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे. युव्रेन युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशांना भेट दिली नसली तरी अनेकदा फोनवर चर्चा केली आहे. गेल्या महिन्यातच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर भारत आणि रशिया यांच्यातील वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोला गेले होते.

ब्रिक्स परिषद रशियात होणार

आगामी ब्रिक्स शिखर परिषद रशियात होणार आहे. यासंबंधीही मोदी आणि पुतिन यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. ब्रिक्स गटात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश आहे. हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा समूह मानला जातो. पूर्वी हा ‘ब्रिक’ गट असायचा पण 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका या गटात सामील झाल्यानंतर त्याची ओळख ‘ब्रिक्स’ अशी झाली आहे. या गटाची पहिली बैठक 2006 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या जी-8 शिखर परिषदेसोबत झाली होती. तर पहिली शिखरस्तरीय बैठक 16 जून 2009 रोजी रशियात झाली होती.

Advertisement
Next Article