उद्धव ठाकरे यांच्या मणिपुर भेटीनंतरही पंतप्रधान मोदी तिथे जाणार काय ?नाशिक दौऱ्यावरून संजय राऊतांची जोरदार टिका
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील काळाराम मंदिराच्या भेटीवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारीला दौऱ्याची घोषणा केल्यानंतरच लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिक मध्ये य़ुवामहोत्सवाचे उद्धाटन केले. तसेच नाशिक मधिल ऐतिहासिक काळाराम मदिराला भेट देऊन त्यांनी त्यांनी मंदिरात स्वच्छता केली.
आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, "याआधी पंतप्रधान मोदी यांचा काळाराम मंदिराला भेट देण्याचा कोणताही विचार नव्हता. पण अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन ज्या दिवशी होणार आहे, त्याच दिवशी 22 जानेवारीला काळाराम मंदीरात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपने पंतप्रधान मोदींना काळाराम मंदिरात जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात आरती करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजताच ते तिथे गेले आहेत." असा दावा त्यांनी केला.
गेल्या वर्षीच्या 3 मे पासून जातीय हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट न दिल्याबद्दल संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना फटकारले आहे.
शिवसेना (यूबीटी) राज्यात राम मंदिराला भेट देण्याची योजना आखत आहे आणि पंतप्रधान मोदी त्याचे अनुसरण करू शकतात.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "मणिपूरमध्येसुद्धा राम मंदिर आहे. तिथले लोक दीड वर्षांपासून पंतप्रधानांची वाट पाहत आहेत. शेकडो लोक मारले गेले आहेत. लोकांची घरे जाळली गेली आहेत. हिंसाचार होत आहे. पण पंतप्रधान अजूनही तिकडे गेलेले नाहीत." असा आरोप त्यांनी केला.
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिष्किल टोला हाणताना ते म्हणाले, "म्हणून, यावर आम्हाला आता एक उपाय सापडला आहे. मणिपूरमध्ये राम मंदिर आहे, जे लहान आहे. आम्ही तिथे जाऊन प्रार्थना करू. मला विश्वास आहे की उद्धव ठाकरे जेव्हा मणिपूरला भेट देण्याची योजना जाहीर करतील, त्याचे अनुकरण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उद्धव ठाकरे यांचे अनुकरण करतील." असे ते म्हणाले.