पंतप्रधान मोदी यांची रामास्वामी, मस्कशी चर्चा
तंत्रवैज्ञानिक संशोधन, अवकाश तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानविषयक चर्चा झाल्याची माहिती
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी जगद्विख्यात उद्योगपती इलॉन मस्क यांची भेट घेतली आहे. व्हाईट हाऊसनजीकच्या ब्लेअर हाऊसमध्ये त्यांच्यात बोलणी झाली. या चर्चेचा वृत्तांत नंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ‘एक्स’च्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. विविध महत्वाच्या विषयांवर ही बोलणी झाली असे त्यांनी त्यांच्या संदेशात गुरुवारी रात्री स्पष्ट केले आहे.
अवकाश संशोधन, मॉबिलिटी, महिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान, तंत्रवैज्ञानिक संशोधन, इनोव्हेशन अशा विविध विषयांवर दोन्ही नेत्यांनी विचारांचे आदानप्रदान केले. तंत्रवैज्ञानिक संशोधनात भारत आणि अमेरिका यांच्यातील संस्थांमध्ये समन्यव आणि एकत्रितपणा आणण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला. सुशासन, उगवती तंत्रज्ञाने, उद्योजकता आणि तत्सम इतर मुद्द्यांवरही दोघांनी एकमेकांचे विचार जाणून घेतले. भविष्यात मस्क यांच्या उद्योगसमूहाशी भारतीय संशोधन संस्था सलग्न करण्याचा मार्ग या चर्चेमुळे मोकळा होण्याची शक्यता आहे.
सहकुटुंब भेट
इलॉन मस्क या भेटीसाठी आपल्या कुटुंबासह आले होते. त्यांच्या तीन अपत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी परिचय करुन घेतला. ही मुले दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी उपस्थित होती. तसेच न्यूरालिंक या कंपनीचे संचालक शिव्हॉन झिल्स हेसुद्धा यावेळी उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली. विशेषत: कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात मस्क भारताशी सहकार्य करणार आहेत.
मायकेल वाल्झ यांच्याशी भेट
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वाल्झ यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन विचारविमर्श केला आहे. यावेळी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे ही उपस्थित होते. त्याही आधी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनीही चर्चा केली होती. तुलसी गॅबार्ड यांच्या ट्रंप यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर त्याआधी काही तासच अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाने आपल्या मान्यतेची मुद्रा उठविली होती. त्यानंतर त्यांनी पदाचे शपथग्रहण केले आणि नंतर ही चर्चा केली.
अनेकदा दोघांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्क यांची पूर्वीही अनेकदा भेट झाली आहे. 2015 मध्ये त्यांनी मस्क यांच्या सॅन जोस येथील टेल्सा उत्पादनकेंद्राला भेट दिली होती. त्यावेळी मस्क स्वत: त्यांच्यासह उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात विजेवर चालणाऱ्या मोटारींवरील आयात शुल्कात कपात करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांवरील आयात शुल्कातही कपात करण्यात आली आहे. या प्रस्तावांचा लाभ मस्क यांना होणार आहे. कारण त्यांच्या वीजेवर चालणाऱ्या टेल्सा कारची किंमत भारतात कमी होणार आहे.
करांचा मुद्दा केला सौम्य
डोनाल्ड ट्रंप हे आयातकराच्या किंवा ‘टॅरिफ’च्या मुद्द्यावर अतिशय आग्रही आहेत. ते यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करतील. टॅरिफच्या मुद्द्यावर ते आक्रमक होणार आहेत. यामुळे चर्चेत भारताची कोंडी होऊ शकते, अशा प्रकारची वातावरणनिर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीपूर्वी सातत्याने करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मुद्द्यावर बॅकफूटवर जातील. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत याच मुद्द्याला प्राधान्य मिळणार असून इतर मुद्दे मागे पडणार आहे, असाही प्रचार केला गेला होता. तथापि, ट्रंप यांनी ऐनवेळी करांच्या मुद्द्यावर सौम्य धोरण स्वीकारल्याचे दिसून आले. चर्चेपूर्वी त्यांनी जो प्रशासकीय आदेश काढला, त्यातही त्यांनी या विषयावर संबंधित देशांशी चर्चा करण्याचा आदेश आपल्या विभागांना दिला आहे. ही चर्चा सहा महिने चालणार असून त्यानंतर ट्रंप यांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर साधकबाधकता पाहून ते निर्णय घेणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भारतावरचे दडपण चर्चेआधीच पुष्कळसे दूर झालेले दिसत होते.
अमेरिका भेट समाधानकारक
ड दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांचे भरगच्च कार्यक्रम
ड इलॉन मस्क यांच्याशी त्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासासंबंधी बोलणी
ड संशोधनाच्या क्षेत्रात भारताशी सहकार्य करण्याची इलॉन मस्क यांची इच्छा
ड भारतीय वंशाचे अमेरिकेतील नेते विवेक रामस्वामी यांच्याशीही झाली चर्चा