पंतप्रधान मोदींचा औरंगजेब असा उल्लेख ! भाजपची संजय राऊतांविरोधात निवडणुक आयुक्तांकडे धाव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश कार्यालयाने केली आहे. काही दिवसापुर्वी एका जाहीर सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख औरंगजेब असा केला होता. त्यावरून राज्यात राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “भारतातील लोकांसाठी अत्यंत आदरणीय असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संजय राऊत यांनी ज्या प्रकारची भाषा आणि उदाहरण वापरले आहे, त्याबद्दल आम्ही कडक शब्दात ताकीद देतो. शिवसेनेच्या (UBT) खासदाराने केलेले हे निंदनीय कृत्य ठाकरे गट कोणत्या पातळीवर घसरला आहे ते दिसून येत आहे.”
ठाकरे गटाला इशारा देताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) येत्या निवडणुकीमध्ये सर्वात वाईट निवडणुकीला सामोरे जाईल. 2024 च्या निवडणुकीत पक्षाचा पूर्ण पराभव झाल्यावर पक्ष कुठे उभा आहे हे त्यांना कळेलच.” बावनकुळे म्हणाले.
भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता म्हणाले, “आम्ही आमची औपचारिक तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे नोंदवत आहोत. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी औरंगजेबाशी करून अपमानास्पद टिप्पणी केली आहे. अशा प्रकारते वक्तव्य हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे निवडणुक आयुक्तांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक कारवाई सुरू करावी." असे त्यांनी म्हटले आहे.