निकालापूर्वी अॅक्शन मोडमध्ये पंतप्रधान मोदी
एका दिवसात सात बैठका : अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर झाली चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपताच समोर आलेल्या सर्व मतदानोत्तर कलचाचण्यांमध्ये मोदी 3.0 सरकार स्थापन होणार असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. परंतु निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. निकाल अद्याप जाहीर झालेला नसला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 7 बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये मोदींनी आगामी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यावर चर्चा केली आहे. याचबरोबर चक्रीवादळानंतरची स्थिती, उष्मालाटेची स्थिती, पर्यावरण दिनासमवेत अनेक मुद्यांवर या चर्चा झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच ब्रेक घेत नाहीत असे बोलले जाते. सलग दीड महिन्यांपर्यंत निवडणुकीसाठी प्रचार केल्यावर ते आता प्रशासकीय स्तरावर सक्रीय दिसून येत आहेत. निवडणुकीच्या काळात त्यांनी विविध राज्यांमध्ये जाहीर सभा, रोड शो करत आघाडी घेतली होती. अशा स्थितीतही त्यांनी प्रशासकीय बैठका घेत महत्त्वाचे दिशानिर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. रेमल चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आल्यावर मोदींनी दिल्लीत अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती.
100 दिवसांच्या रोडमॅपवर चर्चा
बहुतांश मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 7 बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये रेमल चक्रीवादळाने प्रभवित अनेक हिस्स्यांमधील स्थितीचा आढावा घेतला. तसेच चक्रीवादळामुळे ईशान्येत निर्माण झालेल्या संकटावरही बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका बैठकीत पर्यावरण दिनाच्या तयारीची समीक्षा केली आहे. याचबरोबर नव्या सरकारच्या 100 दिवसांच्या रोडमॅपवरही चर्चा करण्यात आली. नव्या सरकारचा 100 दिवसांचा अजेंडा काय असेल यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
उष्मालाटेची स्थिती
हवामान विभागाने यंदा भीषण उष्णता जाणवणार असल्याचा अनुमान व्यक्त केला होता. मे महिन्यात तापमानाने काही ठिकाणी 30 अंश ओलांडले होते. हे पाहता पंतप्रधान मोदींनी उष्मालाटेपासून सर्वसामान्यांना वाचविण्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारींची समीक्षा केली आहे. तसेच मिझोरम, आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरात झालेले भूस्खलन तसेच पूरामुळे झालेली हानी यावरही चर्चा करण्यात आली आहे. भारत सरकार चक्रीवादळाने प्रभावित राज्यांना पूर्ण सहकार्य करणे सुरूच ठेवणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी गृह मंत्रालयाला स्थितीवर नजर ठेवण्याचा आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक सहाय्य प्रदान करण्याचा निर्देश दिला आहे.
5 जून रोजी पर्यावरण दिन
5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील याविषयीच्या तयारीची माहिती पंतप्रधानांनी जाणून घेतली आहे. पर्यावरण दिनानिमित्त केंद्र सरकारकडून अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.