फिनलंडच्या अध्यक्षांशी पंतप्रधान मोदींची चर्चा
व्यापार, तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्यास सहमती
नवी दिल्ली : युक्रेन संघर्ष समवेत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंडचे अध्यक्ष अलेक्जेंडर स्टब यांच्यात चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांनी भारत आणि फिनलंड दरम्यान व्यापार आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शविली. तसेच दोन्ही नेत्यांनी अमेरिकेच्या राजधानीत पार पडलेल्या एका बैठकीबद्दल चर्चा केली आहे. या बैठकीत युरोप, अमेरिका आणि युक्रेनच्या नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्धावरील तोडग्यावर विचारविनिमय केला होता. भारत नेहमीच रशिया-युक्रेन युद्धाच्या शांततापूर्ण तोडगा आणि लवकर शांतता प्रस्थाति करण्याच्या बाजूने राहिला असल्याचे मोदींनी स्टब यांना सांतिले. भारत आणि युरोपीय महासंघादरम्यान मुक्त व्यापार करार लवकर व्हावा अशी फिनलंडची इच्छा असल्याचे स्टब यांनी म्हटले. दोन्ही नेत्यांनी भारत-फिनलंडच्या परस्पर संबंधांची समीक्षा केली आणि पुढील काळात सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त केली आहे. खासकरून क्वांटम तंत्रज्ञान, 6जी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, सायबर सुरक्षा आणि शाश्वत विकासाकरता मिळून काम करण्यावर चर्चा झाली आहे.