पंतप्रधान मोदी यांना घानाचा पुरस्कार
घानाच्या संसदेत केले भाषण, द्विपक्ष संबंधांवर भर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ते या देशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. घानाला भेट देणारे ते गेल्या 30 वर्षांमधील प्रथम भारतीय नेते आहेत. त्यांनी घानाच्या संसदेसमोर भाषण केले. बलवान भारत स्थिर आणि समृद्ध जगासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी घानाच्या संसदेसमोरील भाषणात केले आहे. सध्या जगात मोठी अस्थिरता आहे. या अनिश्चित कालावधीत भारताचे गणतंत्रीय स्थैर्य आणि आर्थिक विकास विशेषत्वाने उठून दिसत आहे. जगाच्या स्थर्यात आणि समृद्धीत सामर्थ्यवान भारताचे महत्वाचे योगदान राहणार आहे.
सध्या भारत जगाच्या वृद्धीदरात 16 टक्क्यांचे योगदान देत आहे. भविष्यकाळात हे योगदान अधिकच वाढणार आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी उगवती अर्थव्यवस्था आहे. भारत आज जागतिक उत्पादनाचे आणि तंत्रज्ञान विकासाचे केंद्र बनला आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप बलस्थान आहे. भारत वेगाने महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून येत्या काही वर्षांमध्ये हे ध्येय आम्ही गाठणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दहशतवाद जगासमोर आव्हान
सध्याच्या जगासमोर दहशतवाद हे सर्वात मोठे आव्हान आहे त्याखेरीज पर्यावरण प्रदूषण, हवामान परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि महामारी आदी इतर आव्हाने आहेत. या आव्हानांना तोंड देताना गेल्या शतकात स्थापन करण्यात आलेल्या जागतिक संस्थांची दमछाक होत आहे. त्यामुळे नव्या जगाला आज नव्या व्यवस्थेची आवश्यकता आहे. आज नव्या परिस्थितींना सामोरे जाण्याची क्षमता असणारी नवी जागतिक प्रशासन व्यवस्था (ग्लोबल गव्हर्नन्स) हवी आहे. भारताची भूमिका या व्यवस्थेत महत्वाची राहणार आहे, अशीही मांडणी त्यांनी भाषणात केली.
आफ्रिकेची ध्येये ही आमची प्राथमिकता
आज दक्षिण गोलार्धातील जगाला समवेत घेतल्याशिवाय इतर जगाची प्रगती होणार नाही, अशी स्थिती आहे. भारताने प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दक्ष्णि गोलार्धाचा आवाज बुलंद केला आहे. आफ्रिकेची ध्येये ही आमची प्राथमिकता आहे. जगात आफ्रिकेला तिचे योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे, असे आम्ही उच्चारवाने प्रतिपादन करीत आहोत. भारताचे आफ्रिकेतील प्रत्येक लोकशाही देशाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आमचे सरकार प्रयत्नशील आहे. घाना देशाचे स्थान आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे या देशाशी निकटचे द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. घानानेही उत्कट प्रतिसाद दिला आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
घानाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार आजवर केवळ मोजक्याच जागतिक नेत्यांना देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी विशेष भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अध्यक्ष महामा यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार ज्या जागतिक नेत्यांनी घानाच्या प्रगतीत आणि विकासात महत्वाचे आणि दिशादर्शक योगदान केले आहे, त्यांना प्रदान केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता या पुरस्काराने प्रदान केलेल्या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा घानाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सॅम्युएल ओगुदझेटो अब्लकवा यांनी या कार्यक्रमात केली. या पुरस्कारासमवेत हे विशिष्ट पद देण्यात येते. अब्लकवा यांनी घानाच्या प्रगतीत भारताच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.