पंतप्रधान मोदींकडून बेंगळूर-बेळगाव ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा
प्रतिनिधी/ बेंगळूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बेंगळूरमध्ये तीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. त्यामुळे आजपासून बेळगावच्या प्रवाशांना बेळगाव-बेंगळूर असा वेगवान प्रवास करता येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी बेंगळूर नागरिकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेल्या नम्म मेट्रोच्या यलो लाईनचे उद्घाटन केले. तसेच बेंगळूर मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली.
आधुनिक शहराला नवीन पिढीच्या वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळूरमध्ये आले होते. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यानंतर मॅजेस्टिक क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्टेशनात जाऊन बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तसेच अमृतसर-श्रीमाता वैष्णोदेवी कत्रा, नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सेवांचे व्हर्च्युअलद्वारे उद्घाटन केले.
दरम्यान, वंदे भारत टेन फुलांनी सजवण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी टेनमध्ये जाऊन काही वेळ रेल्वे प्रवाशांसह आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून रेल्वे प्रवासाच्या अनुभवाची माहिती घेतली. बेळगाव-बेंगळूर दरम्यानची वंदे भारत टेन सोमवारपासून सेवेत दाखल होणार आहे. ही टेन बुधवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावेल. पंतप्रधान मोदींनी चालना दिलेली बेळगाव-बेंगळूर ही 11 वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल थावरचंद गेलहोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, रेल्वे मंत्री अश्निनी वैष्णव, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय शहर विकास मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, केंद्रीय लघु उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव, खासदार तेजस्वी सूर्या, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.