पंतप्रधान आज बेळगावात, उद्या सकाळी सभा
स्थानिक भाजपकडून जोरदार तयारी, लाखोची उपस्थिती अपेक्षित
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार दि. 28 रोजी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांमध्ये वेगळा करिश्मा आहे. त्यांनी देशात मागील दहा वर्षांत विकासात्मक काम केले आहे. त्यामुळे मोदींच्या सभेमुळे बेळगाव जिल्ह्याला बुस्टर डोस मिळेल, असा विश्वास भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांची रविवारी मालिनी सिटी येथे सकाळी 9 वाजता भव्य सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी जगदीश शेट्टर, तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मालिनी सिटी परिसराला भेट दिली. बेळगाव व चिकोडी मतदारसंघांतील तब्बल एक लाखाहून अधिक कार्यकर्ते सभेवेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जय्यत तयारी केली जात आहे. भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर व चिकोडीचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी रविवारी मोदी बेळगावमध्ये येत आहेत. तसेच शनिवारी रात्री त्यांचे बेळगावमध्ये वास्तव्य असणार असल्याने त्यांच्या दौऱ्यात कोठेही उणीव राहू नये, यासाठी भाजपने चोख नियोजन केले आहे. यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार रमेश जारकीहोळी, जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर मडलगी, माजी आमदार अनिल बेनके, महांतेश कवठगीमठ, अॅड. एम. बी. जिरली, शंकरगौडा पाटील यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसकडून अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण
राज्यात काँग्रेसकडून सत्तेत राहण्यासाठी अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण केले जात आहे. नेहा हिरेमठ हत्या प्रकरणात तिच्या चारित्र्याबद्दल खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसकडून हे जाणीवपूर्वक केले जात आहे. तसेच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विशेषत: बेळगाव जिल्ह्यात मराठी व कन्नड भाषिक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. या सर्वांचा पाठिंबा भाजपला असल्याचे शेट्टर यांनी सांगितले.
बेळगावात आज-उद्या ‘नो फ्लाय झोन’चा आदेश : कोणतेही हवाई यंत्र किंवा उपकरण उडविण्यावर बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी 6 पासून रविवारी सायंकाळी 6 पर्यंत बेळगाव परिसरात ड्रोन, पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बंदीचा हा आदेश जारी केला आहे. निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला येत आहेत. शनिवार दि. 27 एप्रिल रोजी रात्री त्यांचा बेळगावात मुक्काम आहे. दुसऱ्या दिवशी 28 एप्रिल रोजी सकाळी येडियुराप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे निवडणूक प्रचारसभेत ते भाग घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सीआरपीसी कलम 144 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणावरून बेळगाव परिसर ‘रेड झोन’ किंवा ‘नो फ्लाय झोन’ असे घोषित करण्यात आले आहे.