Solapur News : सोलापूर बसस्थानकाची दुर्दशा; अव्यवस्था पाहून परिवहन मंत्री संतप्त
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आगारप्रमुखांना केले निलंबित
सोलापूर : चार दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक सोलापूर आगाराची पाहणी केली. त्यांनी आगारप्रमुखांना स्वच्छतेबाबत सूचना केल्या. शुक्रवारी पुन्हा ते स्थानकाची पाहणी करण्यासाठी आले. मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याने त्यांनी आगारप्रमुखांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
गेल्या आठवड्यात सोलापूरमार्गे धाराशिव येथे जात होते. त्यावेळी त्यांनी अचानक गाड्यांचा ताफा सोलापूर एसटीस्थानकाकडे वळवला. या अकस्मिक दौऱ्यात त्यांना बसस्थानकावरील अस्वच्छता, दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था, फुटलेल्या फरशा, सर्वत्र घाणीचे साम्राज्य आढळून आले होते. ही अवस्था पाहून मंत्री सरनाईक संतप्त झाले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना 'चार दिवस देतो... पुन्हा येतो, तेव्हा बदल दिसला पाहिजे" असा स्पष्ट इशारा दिला होता.
त्यानंतर ते शुक्रवारी पाहणीसाठी आले होते. मात्र, दुसऱ्या पाहणीतही त्याच ठिकाणी जुनाच गलथानपणा दिसल्याने मंत्री सरनाईक यांनी संताप व्यक्त करून तत्काळ निलंबनाचे आदेश दिले.