For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या ‘कला अकादमी’ची दुर्दशा

06:15 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या ‘कला अकादमी’ची दुर्दशा
Advertisement

‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली ज्याप्रमाणे अर्धवट विकासकामांमुळे राजधानी पणजीची वाट लागली आहे, त्याचप्रमाणे नूतनीकरणाच्या नावाखाली गोवा राज्यातील सांस्कृतिक ठेवा असलेल्या कला अकादमी वास्तूचीही वाट लागलेली आहे. कला अकादमी वास्तू खऱ्याअर्थाने गोमंतकीय कलाकारांसाठी ‘नक्षत्रांचे देणे’ आहे. गोव्याची जणू ती सांस्कृतिक निशाणी आहे. आता पावसामुळे या वास्तूची दशा, अवस्था काय होईल, या विवंचनेत गोमंतकीय आहेत. गोव्यातून निवडलेल्या नवनिर्वाचित खासदारांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे. कला अकादमीची सध्याची झालेली परिस्थिती, अवस्था ‘न पाहावे डोळा’ अशी झाली आहे. या वास्तूचे जतन, संवर्धन व्हायलाच हवे. वैयक्तिक राजकीय मतभेदातून या वास्तूचा बळी जाऊ नये, अन्यथा गोमंतकीय कलाकार, रसिक तसेच भावी कलाकार पिढी गोवा सरकारला कदापिही माफ करणार नाही.

Advertisement

गोवा राज्याला सुंदर सोबित राज्य (भांगराळे गोंय) म्हणून उपमा दिली जाते. हे राज्य अनेकांना भावते. राज्यातील समुद्र किनाऱ्यांवरील फेसाळत्या लाटा अंगावर झेलण्यासाठी व येथील आल्हाददायक निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक गोव्यात येण्यास आसुसलेला असतो. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांबरोबरच येथील मंदिरे तसेच चर्चेसही पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. राजधानी पणजीत तर पर्यटकांची लगबग असते. मिरामार समुद्रकिनारी जाणारा देशी-विदेशी पर्यटक कांपाल येथील दर्या संगमवर असलेल्या कला अकादमी या सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या वास्तूला निश्चितच भेट देतो. एकीकडे दर्या संगमच्या लाटांचा गाज व त्यात उभी असलेली ही वास्तू पाहून अनेकांचे मन प्रसन्न होते. या कला अकादमीमध्ये अनेकविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. स्थानिक तसेच महाराष्ट्रातील विविध नाटकांची मेजवानी नाट्यारसिकांना लाभते. विविध कला प्रदर्शने याठिकाणी भरविली जातात. दरवर्षी होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, लोकोत्सव यामुळे कला अकादमी व परिसर खुलून उठतो. पेडणेपासून काणकोणपर्यंतचा कलारसिक, कलाकार या वास्तुशी जोडला गेला आहे.

Advertisement

गोव्यात राज्य सरकारने रविंद्र भवने उभारली तरी कार्यक्रम, नाटक पाहण्यास कला अकादमी श्रेष्ठ, पोषक ठरते. कला अकादमीतील कार्यक्रम पाहून रसिकवर्ग तृप्त होतो, सुखावून जातो. उत्कृष्ट ध्वनियंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा तसेच अन्य बाबींमुळे कला अकादमीतील कार्यक्रम ऐकण्यास, पाहण्यास, सादरीकरणास योग्य ठरतो. कला अकादमी ही वास्तू खऱ्या अर्थाने वास्तुशिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अनेकजण विरंगुळ्यासाठी या वास्तुकडे सकाळ-संध्याकाळ भेट देत असतात.

या कला अकादमीच्या वास्तूत पावसाचे पाणी शिरू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे अत्यावश्यक असताना पूर्ण नूतनीकरणाचे काम कोरोना महामारीच्या काळात हाती घेतल्यामुळे विरोधी पक्षातर्फे सरकारवर टीकेची झोड उठली होती. ही केवळ मलई चाटण्याची चाल असल्याची भावना विरोधी पक्षामध्ये तसेच सर्वसामान्य गोमंतकीयांमध्ये उमटली होती. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी या कला अकादमीच्या नूतनीकरणाचा अहवाल गोमंतकीयांसमोर मांडावा, या कारभारात पारदर्शकता असावी, अशी समस्त गोमंतकीय जनतेची मागणी होती. कला अकादमी वास्तूची रचना गोव्याचे प्रसिद्ध वास्तुविशारद तथा नगररचनाकार चार्लस कुरैय्या यांनी केली होती. चार्लस कुरैय्या फाऊंडेशनने तसेच विरोधी पक्षांनी कला अकादमीच्या नूतनीकरणाबद्दल पत्रकार परिषद घेऊन बरेच गंभीर आरोप केले होते.

कला अकादमीच्या मूळ वास्तूच्या बांधकामात कोणताच फेरफार वा बदल करण्यात येणार नाही तर नूतनीकरण करण्यात येत आहे. सर्व बांधकाम पारदर्शक आहे, असा खुलासाही त्यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केला होता. कला अकादमीच्या बांधकामावरून विरोधक तसेच चार्लस कुरैय्या फाऊंडेशनने केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी तसेच बांधकामाची माहिती देण्यासाठी पत्रकारांना घटनास्थळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी प्रत्यक्षात नेले होते व स्पष्टीकरण दिले होते. कला अकादमी संकुलाच्या उद्घाटनाच्या तारखा तसेच नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक मुदती देऊन सरकारकडून जनतेची सतत दिशाभूल करण्यात आली होती. काम सुरू असतानाच या संकुलातील ओपन एअर ऑडिटोरियमचा स्लॅब कोसळल्याने वादाला तोंड फुटले होते. कंत्राटदार मेसर्स टेकटन

बिल्डकॉन्सला त्यावेळी तपशीलवार स्पष्टीकरण देण्यास भाग पडले होते.

अखेरीस गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये, नूतनीकरण केलेल्या कला अकादमी संकुलाचे उद्घाटन झाले. उद्घाटनावेळी ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे मराठी नाटक सादर करण्यात आले आणि विशेष म्हणजे संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका खुद्द कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी वठविली होती. नूतनीकरण केलेल्या या संकुलात हा पहिलाच प्रयोग होता. तद्नंतर झालेल्या अनेक शोमधील कलाकारांनी या संकुलाच्या नूतनीकरणाच्या पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. पाच दशकांपूर्वी लक्षवेधी सजावटीच्या डिझाईन्सव्यतिरिक्त त्या काळातील सर्वेत्कृष्ट ध्वनिप्रणाली आणि उत्कृष्ट बसण्याची व्यवस्था असलेली वास्तुशिल्पीय अद्भूतता आज प्रशासकीय अपयशामुळे कमी दर्जाची झाली आहे, असा आरोप आता होत आहे. 1980च्या सुरुवातीला चार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बांधण्यात आलेल्या या कला अकादमी संकुल नूतनीकरणाच्या नावाखाली आता आकडे फुगीर असल्याने या कामाबाबत तसेच दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या महिन्यात कला अकादमीच्या सभागृहात तियात्र सुरू असताना जोरदार अवकाळी पावसामुळे छप्परातून गळती लागली. त्यामुळे नूतनीकरण कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सध्या गोव्यात मान्सून दाखल झाला आहे. या अल्प मुदतीत कला अकादमीच्या छप्पराची डागडुजी करणे शक्य नाही. त्यामुळे त्यावर ताडपत्री घालून गळती रोखण्याचा पर्याय सार्वजनिक बांधकाम खात्याने निवडला आहे. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी या वास्तूला ‘ताजमहाल’ची उपमा दिली होती व त्यावर ताडपत्री घालावी लागणे, हे दुर्दैव आहे, अशा प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत. कला अकादमी नूतनीकरणाचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुन्हा एकदा सभागृहात पावसाच्या पाण्याने गळती लागून सिद्ध झालेले आहे. ऐतिहासिक वास्तूत असे प्रकार घडल्याने या कामाचे ऑडिट होणे आवश्यक आहे. हे बांधकाम सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. सार्वजनिक बांधकाम खाते खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आहे मात्र त्यांनी यासंदर्भात अद्याप आवश्यक पावले उचललेली दिसत नाहीत.

एकंदरित कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. याची चौकशी होईल की नाही, हे सध्याच्या स्थितीत सांगणे कठीण मात्र कला व संस्कृतीप्रेमींचे फार मोठे नुकसान होत आहे, हे निसंशय नाकारुन चालणार नाही. नूतनीकरणाच्या नावाखाली या वास्तूच्या रचनेला धक्का न लावता गोव्याची ही शान जपावी. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे खुद्द हाडाचे कलाकार आहेत. कलाप्रेमी, कलारसिक आहेत. सध्याच्या स्थितीत कला अकादमीचे भवितव्य त्यांच्याच हाती आहे. कला अकादमीशी गोमंतकातील प्रत्येक कलाकारांचे, रसिकांचे भावनिक नाते आहे. कला अकादमी जणू सांस्कृतिक वारसा आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली या वास्तूची झालेली अवस्था दु:खदायक आहे. वास्तूच्या संरक्षणासाठी आता गोमंतकीय कलाकार, रसिकांबरोबरच समस्त जनतेने पेटून उठण्याची गरज आहे.

राजेश परब

Advertisement
Tags :

.