सौंदर्य वाढविणाऱ्या रोपकुंड्यांची दुर्दशा
सर्व निधी पाण्यात : व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष, देखभालीअभावी कुंड्या मोडकळीस येऊन रोपेही नष्ट
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रोपकुंडांचीच दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी उभारलेल्या कुंडांमुळे सौंदर्याला बाधा जाऊ लागली आहे. देखभालीअभावी रोपकुंडांची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत खर्ची घातलेला निधीही पाण्यात गेला आहे. मनपा प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. शहरातील रस्त्यांवर हिरवळ वाढावी, यासाठी धर्मनाथ भवन सर्कल, अशोकनगर, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, केपीटीसीएल मार्गावर रोपांचे कुंडे बसविण्यात आले होते. यावर रोपेही लावली गेली होती. मात्र, त्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्याने कुंडातील रोपे सुकली आहेत. त्याबरोबर कुंडांचीही दुर्दशा झाली आहे. पाण्याअभावी कुंडातील रोपे नाहीशी झाली आहेत.
700 हून अधिक रोपे
स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल 43 कोटींचा निधी विविध विकासकामांसाठी खर्ची करण्यात आला होता. या अंतर्गत विविध रस्ते आणि रस्त्यांवर शोभा वाढविण्यासाठी रोपकुंड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र, देखभालीअभावी कुंड्या मोडकळीस येऊन रोपेही नष्ट झाली आहेत. 700 हून अधिक रोपे या कुंड्यांमध्ये लावण्यात आली होती. मात्र, दुर्लक्ष आणि देखभालीअभावी रोपे नष्ट झाली आहेत. तर काही ठिकाणी कुंड्यांही नाहीशा झाल्या आहेत.
सौंदर्य वाढविणाऱ्या साहित्याला बाधा
शहरात तयार केलेले सायकल ट्रॅकही वापराविना पडून आहेत. या सायकल ट्रॅकवर फेरीवाले आणि चारचाकी वाहने दिसून येत आहेत. विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढल्याने सायकल ट्रॅक झाकोळला गेला आहे. तर काही ठिकाणी या सायकल ट्रॅकचीही दुर्दशा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याशेजारी सौंदर्य वाढविणाऱ्या साहित्यालाच बाधा जात असल्याचे दिसत आहे.