दरूज येथे एक हजार वृक्ष लागवड संकल्प
वडूज :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू झाला आहे. खटाव तालुक्यातील दरुज येथे ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील हनुमान मंदिरामध्ये विशेष ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.
यावेळी आमदार महेश शिंदे, गटविकास अधिकारी योगेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पोमण, सरपंच नंदा खामकर, उपसरपंच रोहित लावंड, ग्रामसेवक विपुल काकडे, चेअरमन सुरेश यादव, तानाजी पाटोळे, कालिदास पाटोळे, महादेव पाटोळे, सुरेश लावंड, किसन लावंड, प्रकाश खराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गटविकास अधिकारी योगेश कदम अभियानाबद्दल माहिती देताना म्हणाले, अभियानात आपणाला ग्रामपंचायत करवसुलीपासून ते केंद्रशासन व राज्यशासन लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत राबवायच्या आहेत. अभियानाचा कालावधी जरी कमी असला तरी दरूज ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
किरण इनामदार म्हणाले, आमदार महेश शिंदे यांनी आपल्या गावाला मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण गाव टंचाईमुक्त झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा, शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला असून ग्रामस्थांनी या अभियानात सक्रीय सहभाग घेऊन राहिलेला विकास करून, घ्यावा असा विश्वास व्यक्त केला. अभियान राबविण्यासंदर्भातील माहितीचे वाचन ग्रामसेवक विपुल काकडे यांनी केले
यावेळी कॅप्टन आनंदराव लावंड, प्रा. आनंदराव जाधव, अॅड. के. एस. खामकर यांनी अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले.
या अभियानात परिसरातील तसेच भुरकवडी ते दरुज-दरजाई मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक हजार वृक्षारोपणाचा शुभारंभही मान्यवरांच्या हस्ते करून माणदेशी फाऊंडेशनच्या डॉ. राजश्री जाधव यांच्या माध्यमातून शेळ्यांचे लसीकरण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्या लता लावंड, विजया लावंड, आशा मदने, सारिका आवळे, रमेश पाटोळे, विठ्ठल आवळे, सावता माळी यांनी केले.
प्रास्ताविक उपसरपंच रोहित लावंड यांनी केले. सूत्रसंचालन विलास कदम यांनी तर आभार सचिन लावंड यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच दरुज, दरजाई, पवारवाडी, धारपुडी, भुरकवडी परिसरातील ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग उपस्थित होता.
- गावाचा नंबर येणारच या दृष्टीने अभियान राबवा...
आमदार महेश शिंदे म्हणाले, शासनाने राज्यभर राबविलेल्या या अभियानात गावचा नंबर येणारच हा दृष्टिकोन ग्रामस्थांनी डोळ्यासमोर ठेवून हे अभियान गावामध्ये राबवा. नंबर नाही आला तरी चालेल; पण हे गाव राहिलेल्या विकासापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे.