For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृपया इकडे लक्ष द्या

06:24 AM Oct 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
कृपया इकडे लक्ष द्या
Advertisement

कृपया इकडे लक्ष द्या’.... अशी घोषणा रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच काही महत्त्वाच्या ठिकाणी नेहमी ऐकायला मिळते. लक्ष देऊन ऐकणे, लक्षात ठेवणे, लक्षात आणून देणे, लक्ष ठेवून असणे हे सगळे चित्तावर अवलंबून आहे. मन स्थिर असले तर लक्ष आपोआप लागते. लक्ष लागले की आनंद आणि शांती लाभते. संत ज्ञानेश्वर माऊलींचा एक सुरेख असा अभंग आहे, ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती.’ हा अभंग आत्मसुख देणाऱ्या विठ्ठलाच्या रूपावरती आहे. विठ्ठलाच्या मूर्तीतून माऊलींना दिव्य तेजाचा प्रत्यय येतो आहे. त्याची शेवटची ओळ आहे : ‘दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये, तव भितरी पालटू जाला’. प्रख्यात समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी सर म्हणत की माऊलींचा हा अभंग परिवर्तनाचा आहे. त्याचे केंद्र ‘भितरी पालटू जाला’ असे आहे. माणसांना सतत बदल हवा असतो. एखाद्या दीर्घ आजारपणानंतर डॉक्टरही सल्ला देतात की हवापालट करून या. माणूस वैतागतो, त्रासतो, कंटाळतो तेव्हा त्याला उगीचच वाटते, शहर, माणसे, अन्न यात जरा बरा बदल झाला की बरे वाटेल. तो त्याचा भ्रम असतो. लोक स्वत:लाच कंटाळलेले असतात. स्वत:च्या आत्म्याची निरंतर सोबत असूनही स्वत:चा सहवास स्वत:च निर्जीव करून टाकतात. जेव्हा अंतरातल्या चैतन्याचा अनुभव येतो तेव्हा अकस्मात चित्तपालट होतो आणि नंतर सारे जग आनंदमय भासू लागते. सर म्हणत की जड वस्तूत परिवर्तन अशक्य आहे. त्याची फक्त झीज होते; मात्र चैतन्य अखंड परिवर्तनशील असते. ‘भितरी पालटू’ होण्यासाठी स्वामित्व आणि ममत्व सोडावे लागते. अंतरंगात पालट होण्यासाठी एकाग्रता अर्थात लक्ष केंद्रित व्हावे लागते. मीपणाचा कोष नाहीसा झाला की ‘तू आणि तूच’ ही चैतन्यमय अनुभूती येते. चित्त एकाकार झाले की आनंद सर्व ठिकाणी भरून उरला आहेच हे कळू शकते.

Advertisement

एक आख्यायिका अशी आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी समाधीत उतरताना आपल्याबरोबर ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय नेला. नववा अध्याय हा श्रीकृष्णमय आहे. हा अध्याय भक्तीचे खरे स्वरूप सांगतो. कुठल्याही कर्मफळाची आसक्ती केली की आणि ते ईश्वरार्पण झाले की भक्ती साधते म्हणून परमेश्वरालाही योगी, संन्यासी, ज्ञानी यांच्यापेक्षाही कांकणभर सरस असा भक्त प्रिय असतो. या अध्यायात भगवंत-भक्त हा संवाद आहे आणि नवव्या अध्यायाचा प्रारंभ असा आहे, ‘तरी अवधान एकले देइजे €। मग सर्व सुखांसी पत्र घेईजे । हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आईका ।’ भगवंत अर्जुनाला म्हणतात, परमेश्वराची भक्ती हे परमगुह्य आहे. माऊली म्हणतात, ‘तुम्ही आता जे ऐकणार आहात त्यात जन्माचे कल्याण आहे. त्याला महत्त्व द्या. हे तुम्हाला कधी कळेल? तर अत्यंत लक्षपूर्वक ऐकाल तरच. ही माझी उघड प्रतिज्ञा आहे’. लक्ष एकाग्र झाले की देहाचा विसर पडतो आणि नामस्मरणामध्ये माणूस स्वत:ला विसरला की क्षणात उगवला आणि क्षणात मावळला अशा आनंदाची किंमत राहत नाही. तर त्याला शाश्वत आनंदाची प्राप्ती होते म्हणून माऊली म्हणतात, आता माझ्याकडे लक्ष द्या. मग तुम्हाला सुख प्राप्त होईल.

पू. बाबा बेलसरे यांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाचे निरुपण करण्यापूर्वी एक स्वत:चा अनुभव सांगितला आहे की, कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना मानसशास्त्र शिकवणारे फार विद्वान प्राध्यापक होते. एकदा पू. बाबांनी त्यांना प्रश्न विचारला की मानसशास्त्राचा अभ्यास मी कसा करू? तेव्हा ते म्हणाले, ‘तुम्हाला अभ्यास करताना, व्याख्यान ऐकताना असे वाटले पाहिजे की जगात यापेक्षा महत्त्वाची दुसरी गोष्ट नाही. माझे सगळे भविष्य यावर अवलंबून आहे. त्यामुळे एकाग्रता साधते आणि विषयातले मर्म कळते’. मेंदूमधले अनावश्यक सगळे निघून जावे आणि लक्ष देऊन ऐकावे तरच भक्तीचे मर्म कळेल, असे माऊली म्हणतात.

Advertisement

इतिहास असे सांगतो की पारतंत्र्याच्या काळामध्ये सेनापती बापट यांनी त्यांच्यासमोर असणाऱ्या भव्य तरुण श्रोतृसमुदायाला कवितेच्या माध्यमातून हाक दिली, ‘आई स्वतंत्र नाही आम्ही मुले कशाला? आईस सोडवाया येणार कोण बोला?’ त्यांचे हे बोल लक्ष केंद्रित करून ऐकणाऱ्या तरुणांचे काळीज चिरत गेले आणि बहुसंख्य युवकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून दिले. भारतमातेला श्रृंखलामुक्त करण्याचा ध्यास घेतलेल्या युवकांचे बलिदान फार मोठे आहे. आत्मविश्वास, बुद्धिचातुर्य, शारीरिक बळ असलेले तरुण ज्या पायवाटेने पुढे जातात तिथेच पुढे पथ, भव्य रस्ता तयार होतो. एखाद्या वृद्ध, तपस्वी, ज्ञानी व्यक्तीला भेटलो की कळते की या तेजस्वी, संपन्न व्यक्तिमत्त्वाची पाळेमुळे त्यांच्या तरुण वयात कुणी महात्म्याने रुजवली, फुलवली आहेत. ध्यास आणि साहसाचे खतपाणी हे श्रवणाने घातले आहे. सहवासापेक्षा लक्षपूर्वक ऐकण्याने मनाचे भरणपोषण झाले आहे. पूर्वी सभांमध्ये बहुसंख्येने तरुण मुले, मुली उपस्थित असायचे. त्यांची मने ही उत्सुक आणि तहानलेली असायची. एखाद्या प्रतिभासंपन्न व्यक्तीचे चरित्र अभ्यासताना कळते की त्यांच्यावर बराचसा प्रभाव हा त्यांनी त्यांच्या घडणीच्या काळात ऐकलेल्या भाषणांचा असतो. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (यांना न भेटता) नुसत्या त्यांच्या भाषणांनी जगण्याला कलाटणी मिळालेले कितीतरी लोक आजही भेटतात. लक्षपूर्वक श्रवण हेच त्याचे मर्म आहे.

लक्ष देऊन ऐकणे ही श्रवणभक्ती माणसाच्या आंतरिक प्रवासाची सुरुवात आहे. श्रवणाने मनाला जाग येते. मन खुशाल, शांत झोपलेले असते. आतला आवाज बोलायला उत्सुक असतो. परंतु मनाचे दार आतून पक्के लावून घेतलेले असते. ठोठावले तरी ऐकू येत नाही. कधी ऐकले ना ऐकल्यासारखी कृती घडते. कधी दाराची कडी इतकी उंच असते की मनाची उंची तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ते उघडता येत नाही. श्रवणभक्तीत येणारी चार श्रवणविघ्ने समर्थ रामदास स्वामींनी सांगितली आहेत. श्रोत्यांनी या विघ्नांपासून परावृत्त व्हावे म्हणून समर्थांनी ही विघ्ने नजरेस आणून दिली आहेत. पहिले आहे ते शरीरसापेक्ष. त्यात पोटभर जेवून आल्याने तहान लागणे, लघुशंका, जांभया इत्यादी. तर परिसरसापेक्षमध्ये कृमी, कीटक यांचा त्रास तर कधी गोंगाट. वक्तीसापेक्ष विघ्नेही असतात. विषयाला सोडून कंटाळवाणे बोलणे, मतभेद, अहंभाव, हौस हे प्रकार अनुभवायला येतात. चौथे आहे ते चित्तसापेक्ष. चित्त एकाग्र न होणे, श्रवणामध्ये प्रपंचाची सतत आठवण येणे.

भगवान श्रीकृष्णाने गीता कुरुक्षेत्रावर सांगितली तेव्हा संजयला अशी शक्ती दिली होती की घरी बसून तो कुरुक्षेत्रावर काय चालले आहे हे धृतराष्ट्राला सांगत होता. जे नेत्रहीन असतात त्यांचे कान तीक्ष्ण असतात. श्रुतीसंवेदना तीव्र असते. परंतु धृतराष्ट्र याला अपवाद ठरला. माऊली म्हणतात, ‘अहो ऐकिजत असे की अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी का पुरा । तैसा उगाची असे  ।। ‘धृतराष्ट्राचे मोठे भाग्य होते की गीतेची गंगा त्याच्या कानापाशी आली; तरी हा त्या ठिकाणी असूनही परगावी गेल्यासारखा अमृतवर्षेपासून कोरडाच राहिला. नदीला पूर येऊनही एखादा रेडा जसा त्यात मनाने कोरडाच राहतो, तसा हा म्हातारा आहे. गीतेची अमृतवृष्टी झाली तेव्हा संजय मात्र सात्विक भावांनी मोहरून गेला. उत्तम श्रवण म्हणजेच लक्ष एकाग्र करणे. मन ताजे, कोरे असेल तर श्रवणभक्ती साधते. लक्ष लागण्यासाठी भगवंताच्या नामस्मरणाची सवय लावून घ्या हे संत परोपरीने सांगतात. ते लक्षात ठेवले पाहिजे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.