महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आनंददायी शिक्षण

06:21 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवीन वर्षाची सुरुवात अनेक संकल्प सोडण्याने होत असते परंतु संकल्प वर्षभर लक्षात ठेवून पाळायचे असतात. वर्षाची सुरुवात आनंददायक असतेच परंतु वर्षभर आनंदी जावे याकरिता घरातील मुला-मुलींच्या आनंदी राहण्यासाठी प्रयत्न केल्यास ती दीर्घकालीन गुंतवणूक ठरते.  लहानपणी भोगलेल्या शिक्षा, घरात होणाऱ्या हिंसाचाराची लहानपणी वाटणारी भीती, लहान वयामध्ये झालेला छळ अनेक वर्षे त्यांच्या मनात घर करून राहतो. त्यामुळे घरी, शाळेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी मुलांच्या आनंदाचा विचार आपण सर्वांनीच करण्याची धडपड करायला हवी.

Advertisement

शाळेमध्ये जे विषय शिकवले जातात त्या विषयांची गोडी लावण्यासाठी त्यामधील  रुक्षपणा टाळून शिक्षक तो विषय अनोख्या पद्धतीने शिकवू शकतात. धाकदपटशा दाखवून शिक्षण देण्याचे दिवस पेंव्हाच गेले. या शैक्षणिक वर्षामध्ये आपण या विषयासंदर्भात काय शिकणार आहोत याचा परिचय किती शाळांमध्ये करून दिला जातो, अनुक्रमणिकेची ओळख करून देण्याचा वेगळा तास घेतला जातो का, असे अनेक प्रश्न आहेत. मराठी-इंग्रजीच्या पुस्तकातील चार लेखकांची नावे सांगा, या प्रश्नावर अनेक मुले निरुत्तर होतात. अलीकडेच एका शाळेमधील वर्गात सावित्रीबाई फुलेंचा फोटो दिसल्यावर त्यांच्याविषयी माहिती विचारली. काही वेळानंतर एका मुलीने सांगितले, “सावित्रीबाईंनी स्त्राr शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली”.  या वाक्याचा अर्थ विचारल्यावर कोणालाही सांगता आला नाही. त्यामुळे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यांची शाळा आणि आपल्या मुलीला पोत्यात घालून त्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ पाहणाऱ्या वडिलांची गोष्ट सांगितल्यावर सर्वांना समजले. पण मूळ प्रश्न हाच की सावित्रीबाईंचा फोटो लावून छापील भाषणे शिकवण्यामध्ये आपली शिक्षण पद्धती धन्यता मानते, हे गंभीर आहे.

Advertisement

सोलापूरच्या एका शाळेमध्ये वाचन वर्ग घेण्यासाठी शाळेला भेट दिली असता ‘वाचनाचा तास’ सुरु करण्यापूर्वी शाळेच्या शिक्षकांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस हार घालण्याची विनंती केली. तो सोपस्कार पार पाडल्यानंतर वाचनाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान देण्याऐवजी मुलांना बोलते करण्याचा प्रयत्न केला आणि पहिला प्रश्न विचारला, “संत गाडगेबाबा कोण होते आणि त्यांनी विशेष कार्य काय केले?”. पाचवीपासून पुढील कोणत्याही विद्यार्थी-विद्यार्थिनीला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे पुढील दहा मिनिटे संत गाडगेबाबांनी स्वच्छतेकरीता झाडू हातात घेतला आणि जिथे कचरा दिसेल तो परिसर झाडण्यास सुरुवात केल्याबद्दल सांगितले आणि त्यांना स्वच्छतेचे महत्त्व तेंव्हा कळल्याची गोष्ट सांगितली. त्यानंतर काही परिच्छेद वाचून घेतले, त्याबद्दल मुला-मुलींना सुधारणा सुचवल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एक तास शाळेत घालवल्यानंतर मी शाळेमधून निघताना शिक्षकांना मुलांचे शौचालय कुठे आहे असे विचारले. त्यावर शिक्षक म्हणाले, “मुलांच्या शौचालयात जाऊ नका, शिक्षकांकरीता वेगळे शौचालय आहे”.  “शिक्षकांकरीता वेगळे शौचालय का?” या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. वरच्या मजल्यावर संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि खालच्या मजल्यावर सर्वत्र मुलांच्या शौचालयाची दुर्गंधी अशी विदारक स्थिती बघितली.  शाळेची संस्कृती शाळेच्या शौचालयावरून ठरते. अनेक मुले-मुली शाळेचे शौचालय वापरण्यास नाखूष असतात. त्यामुळे त्यांना बराच वेळ तग धरून राहण्याची सवय अंगीकारावी लागते. अलीकडेच कर्नाटकात एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करवून घेतले. अनेक शाळांमध्ये आजही विद्यार्थ्यांना पडेल ते काम करावे लागते, याचे कारण शिक्षकांचा आदेश. हे अर्थातच आनंददायी शिक्षण नव्हे.

कोणत्याही शिक्षकांच्या हातात छडी असू नये, हा साधा नियम करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात अद्याप महाराष्ट्र मागे आहे. अद्यापही अनेक शाळांमध्ये शिक्षकांचा आवाज दटावणी करण्याचा असतो. ‘गप्प बसा’ संस्कृतीचा पुरस्कार करणारे शिक्षक आणि पालक शिक्षण आनंददायी करण्यामध्ये मोठी आडकाठी आहेत. शाळा ही ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवण्याची जागा नव्हे.  निरंतर प्रश्न विचारण्यामुळेच शिक्षण आनंददायी होऊ शकते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना ‘कोणताही प्रश्न विचारा’ अशी सुरुवात केल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी दिग्मूढ होतात. याचे कारण त्यांना इतर वेळी बोलण्याची संधी दिली जात नाही. दरडावणीच्या माराच्या धाकावर शिक्षण घेणारी मुले कधीही चौकस होत नाहीत. आपल्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव असल्याचा पाया शालेय शिक्षणात दिसतो.

प्रश्न विचारल्याशिवाय विज्ञानाची आवड जोपासता येणार नाही. एकाच प्रश्नाचे उत्तर दरवर्षी वेगवेगळे देण्याची सवय लावून घेण्याचे शिक्षण शाळेमध्येच मिळाले तरच ‘आकाशाचा रंग फक्त निळा नसतो’, ‘कोकिळा कधी गात नसते, गाणारा कोकीळ असतो’, ‘वाघ कधीही गुहेत राहत नाही, वाघाची पिल्ले राहतात’, ‘चिमणी घरट्यात राहत नाही, चिमण्यांची पिल्ले राहतात’, ‘आकाशात एकच चंद्र नसतो’ असे सत्य वारंवार प्रश्न विचारत राहिल्यामुळेच समजते.

इतिहासाची आवड जोपासण्यासाठी सचित्र इतिहास उत्तम चित्रपटांच्या सहाय्याने बघितल्यास त्याचे दृश्य रूप नजरेसमोर उभे राहते. आपण पुस्तकामध्ये किंवा कोणत्याही चित्रपटामध्ये बघितलेले दृश्य हाच खरा इतिहास नव्हे, इतिहास हा सर्व बाजूंनी वाचण्याची गरज आहे, याचे प्रत्यंतर शालेय शिक्षणामध्ये येण्याची गरज असते. त्यासाठीच कोणतेही युद्ध एकाच देशाच्या बाजूने लिहिलेल्या पुस्तकामधून वाचल्यानंतर त्याची दुसरी बाजूही वाचणे आवश्यक असते. अशा पद्धतीने इतिहास समजतो आणि इतिहास विषयाची गोडी लागू शकते.

करिक्युलम म्हणजेच अभ्यासक्रम काय आहे या दृष्टीने विषयाचा अभ्यास केल्यास ते वाचन निरस होऊ शकते. त्यामुळे गुण मिळवण्यापुरता अभ्यास न करता विषय समजून घेण्यासाठी शिक्षण घ्यावे. ‘ब्राझील दहा मार्काला आणि आफ्रिका तीन मार्काला’ अशाप्रकारे जागतिक इतिहासाचा अभ्यास होणार नाही. जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी झाडे-पाने-फुले-पक्षी-प्राण्यांचे जग घराबाहेर पडून बघायला हवे. त्यासाठी पालकांनी सुट्ट्यांचे नियोजन करण्याची गरज आहे. शहरातील मुलांना ‘अॅग्रो टुरिझम’ सफर मातीमध्ये हात घालून घडवावी लागेल. गावाकडच्या मुलांना शेती-मालाची विक्री शहरात कशी होते, याचे प्रात्यक्षिक दाखवण्याची गरज आहे. कोणतीही भाषा वारंवार ऐकल्यामुळे शिकता येते. लिखाणाऐवजी ऐकणे आणि बोलणे याला प्राधान्य दिल्यास भाषेची गोडी लागेल. कोणताही निबंध लिहिण्यापूर्वी त्याचे मुद्दे काढता आले, त्याबद्दल विचार करता आला तर निबंध लिहिता येतो. शिक्षक अथवा पालकांनी सांगितल्या-बरहुकुम निबंध लिहिल्यामुळे गुण मिळू शकतात परंतु त्याचा उपयोग भावी आयुष्यात होत नसतो, हे शिक्षक-पालकांनी समजून घ्यायला हवे.

शाळेत न शिकवल्या जाणाऱ्या विषयांची गोडी लावण्याचे काम पालकांना करावे लागते. संगीत असो वा कोणतीही कला, खेळ असो वा स्वयंपाक करणे, या एक्स्ट्रा-करिक्युलर म्हणजेच अभ्यासक्रमाच्या बाहेरचे विषय नाहीत. हे विषय शिकण्यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींसोबत तेवढा वेळ देऊन शिकवायला हवे. शिकवण्या लावल्यामुळे किंवा लागेल तेवढा पैसा खर्च केल्यामुळे पालकत्व संपत नसते. पालकत्व ही निरंतर शिकण्याची बाब आहे. पालकांनी शिक्षणामध्ये प्रयोग कसे करावे यावर लीला पाटील (शिक्षण देता घेता), अनिल अवचट (स्वत: विषयी), शोभा भागवत (सारं काही मुलांसाठी) अशा अनेक लेखकांनी त्यांनी केलेल्या प्रयोगाबद्दल सविस्तर लिहिले आहे. पालकांनी आपल्या पाल्याला अनेक ठिकाणचे अनुभव घेण्याची संधी दिली, तर शिक्षण आनंददायी होईल आणि शालेय शिक्षणाला अनुभूतीची जोड मिळेल. पालकांनी प्रयत्न केले तर विजयची एक वर्षाची नात स्वत:च्या हाताने सर्व काही खाते. शाळा आणि त्यानंतरच्या शिकवण्या घेता घेता मुलांच्या शिक्षणामधील आनंद हरपलेला दिसतो. म्हणूनच आई-वडील दोघांनी प्रत्येकी किमान एक तास आपल्या पाल्याला शिक्षणातील आनंद शोधता यावा, याकरिता खर्च करावा. तीच पालकांची दीर्घकालीन गुंतवणूक ठरेल.

सुहास किर्लोस्कर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article