For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफलातून ‘प्लेमेकर’...मनप्रीत !

06:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
अफलातून ‘प्लेमेकर’   मनप्रीत
Advertisement

1968 व 1972 नंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये लागोपाठ पदकं जिंकण्यात भारनीय हॉकी संघानं यश मिळविल्यानंतर गाजावाजा सुरू झाला तो गोलरक्षक पी. आर. श्रीजेश नि ‘पेनल्टी कॉर्नर’ तज्ञ हरमनप्रीत सिंगचा...ते स्वाभाविक असलं, तरी यात महत्त्वाची भूमिका राहिली ती गेल्या 13 वर्षांपासून संघातील महत्त्वाचा खेळाडू राहिलेल्या मनप्रीत सिंगचीही...

Advertisement

5 ऑगस्ट, 2021...जपानची राजधानी टोकियो...भारताच्या ऑलिम्पिकमधील हॉकीच्या इतिहासातील सर्वांत संस्मरणीय क्षणांपैकी एक...क्षणोक्षणी पारडं हेलकावे खात असल्यानं तो सामना पाहणारे लाखो लोक टीव्हीसमोरील खुर्चीला खिळले होते. कोण शेवटी बाजी मारेल हे कळत नव्हतं...परंतु भारतानं माजी विश्वविजेत्या जर्मनीला 5-4 नं पराभूत करून कांस्यपदक निश्चित केलं आणि मैदानावरच बसकण मारलेल्या त्या कर्णधाराला अश्रू अनावर झाले...आपण इतिहासाच्या पुस्तकातील एक अंक नव्यानं कसा लिहिलाय त्याची हळूहळू जाणीव होणारे सहकारी आनंदानं मैदानात आजूबाजूला धावत जल्लोष करताना तो जवळजवळ अविश्वासानं पाहत होता...प्रसंग होताही तसाच...संघाच्या पदरात ऑलिम्पिक पदक पडलं होतं ते तब्बल थोड्याथोडक्या नव्हे, तर 41 वर्षांनी...

8 ऑगस्ट, 2024...पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसारख्या तगड्या संघांना लोळवत सर्वांना चकीत करून सोडलेल्या भारतीय संघाला त्याच जर्मनीविरुद्ध हात टेकावे लागले. पण कांस्यपदकासाठीच्या लढतीत स्पेनचं आव्हान 2-1 नं नमवत त्यांनी करून दाखविली ती 52 वर्षांनी ऑलिम्पिक पदकं लागोपाठ जिंकण्याची किमया...या संघाचं अधिपत्य त्याच्याकडे नव्हतं, गोल करण्याच्या बाबतीतही तो आघाडीवर नव्हता. तरीही एकंदरित कामगिरीत त्यानं बजावलेली मोलाची भूमिका कुणालाही नजरेआड करता येणार नाही...मनप्रीत सिंग...

Advertisement

गरिबीनं ग्रासलेलं बालपण, उदरनिर्वाहासाठी धडपडणारं कुटुंब, अजूनही मनात सलणारा आरोप...अन् या साऱ्यांतून सावरून वेळोवळी घेतलेली विलक्षण झेप...भारतीय हॉकी संघाच्या मध्यफळीचा आधारस्तंभ मनप्रीतच्या कहाणीत असा ‘फिल्मी’ वाटण्याजोगा मसाला ठासून भरलाय...गावातील ‘हॅपी गो लकी’ वृत्तीचा मुलगा ते भारतीय हॉकीचा सर्वांत मौल्यवान खेळाडू हा त्याचा प्रवास लक्षणीय असाच...2011 मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केल्यानंतर तो हळूहळू एकेक पायरी चढत गेला आणि आज केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक हॉकीमधील सर्वांत निपुण खेळाडूंपैकी एक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय...

मनप्रीत सिंगला पहिल्यांदा वरिष्ठ राष्ट्रीय शिबिरासाठी बोलावणं आलं ते 2010 मध्ये. त्यावेळी शिबिराची सूत्रं होती भारताचे माजी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्याकडे...‘मी नुकताच राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला होता आणि त्यावेळी अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होते. माजी बचावपटू जुगराज सिंग यांनी मनप्रीत नावाच्या तऊणाची शिफारस केली आणि आम्ही त्याची चाचणी घेण्याचं ठरविलं. त्यानं चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली. योग्य मार्गदर्शन लाभल्यास तो भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होऊ शकतो याची आम्हाला कल्पना आली’, हरेंद्र सिंग सांगतात...

कोणत्याही स्थानावर खेळण्याची क्षमता असलेला आणि आधुनिक हॉकीमधील सर्वांत परिपूर्ण खेळाडूंपैकी एक मानला जाणारा मनप्रीत हा लाखमोलाचा ‘सिक्का’ ठरण्यास वेळ लागला नाही...पुढच्याच वर्षी त्यानं भारताच्या कनिष्ठ नि वरिष्ठ अशा दोन्ही संघांत पाऊल ठेवलं आणि लंडनमधील 2012 ऑलिम्पिकसाठीच्या चमूत देखील त्याची वर्णी लागली...त्यापूर्वी 2008 मधील बीजिंग ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ पात्रही ठरू शकला नव्हता. लंडनमध्ये सुद्धा सर्व सामने गमवावे लागून वाट्याला आलं ते निराशाजनक 12 वं स्थान...

त्यावेळी मनप्रीत सिंग होता 19 वर्षांचा. परंतु त्याचा काहीही परिणाम न झालेला, उलट त्या अनुभवानं उत्साह वाढलेला हा युवक कनिष्ठ संघात परतला आणि 2013 मधील ज्युनियर हॉकी विश्वचषकासाठी त्याच्याकडे कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्याच वर्षी त्याच्या नेतृत्वाखालील कनिष्ठ संघानं ‘सुलतान ऑफ जोहोर’ चषक उचलला आणि 2014 मध्ये मनप्रीत वरिष्ठ संघात परतला...त्या वर्षी भारतानं दक्षिण कोरियाच्या इंचॉनमधील आशियाई खेळांत सुवर्णपदक, तर ग्लासगोतील राष्ट्रकुल खेळांत रौप्यपदक पटकवलं. दोन्ही ठिकाणी त्यानं चमक दाखवली. मनप्रीत सिंग संघाचा अविभाज्य भाग बनला तो तेव्हापासूनच...

त्यानं दुसऱ्यांदा ऑलिम्पिकचा अनुभव 2016 साली रिओमध्ये घेतला. तिथं आपण शेवटच्या आठ संघांपर्यंत मजल मारताना आयर्लंड नि अर्जेंटिनाचा पराभव केला, परंतु उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचं आव्हान जड गेलं...मनप्रीतच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा क्षण आला तो 2017 मध्ये. तेव्हा आशिया चषक स्पर्धेसाठी अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत कर्णधार म्हणून भारतीय हॉकी संघाची सूत्रं त्याच्याकडे सोपविण्यात आली. त्यापूर्वी दशकभरापासून ही स्पर्धा भारताला जिंकता आली नव्हती. पण मनप्रीत सिंगच्या या नवीन टप्प्याला धडाकेबाज पद्धतीनं सुरुवात करून देताना संघानं जेतेपद उचलून दाखविलं...

त्यानंतर मनप्रीतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आलं आणि त्याच्या नेतृत्वाखालील संघानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुवर्ण, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्य, तर 2018 च्या आशियाई खेळांत कांस्यपदक अशी पदकांची लयलूट करत हा निर्णय सार्थ ठरविला. 2019 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा ‘प्लेयर ऑफ दि इयर’ म्हणून निवडण्यात आलं. हा सन्मान प्राप्त होणारा तो पहिला भारतीय...पण यापैकी कुठल्याही यशाला त्याच्या अधिपत्याखालील संघानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्यपदकांची सर नाही...

टोकियो ऑलिम्पिकनंतर बरंच काही घडलं...2021 मध्ये अर्जुन पुरस्कारानं मनप्रीतला सन्मानित करण्यात आलं आणि कर्णधारपदावरून पायउतार होण्यापूर्वी 2022 च्या राष्ट्रकुल खेळांत त्याच्या संघानं रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर गोलरक्षक श्रीजेशप्रमाणं त्याच्याही वाट्याला आली ती हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील चमूत ज्येष्ठ सदस्याची भूमिका बजावण्याची. ती पुरेपूर निभावताना त्याच्या खात्यात जमा झालं ते 2014 प्रमाणंच 2022 च्या आशियाई खेळांतील सुवर्ण व त्यावर कडी करणारं आताचं ऑलिम्पिकमधील आणखी एक कांस्य...

पॅरिसमधील मनप्रीतचं मोल सिद्ध करण्यासाठी दोनच सामन्यांचं उदाहरण पुरेसं...ब्रिटनविऊद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत अमित रोहिदासला वादग्रस्त लाल कार्ड दाखविण्यात आल्यानंतर भारतीय संघावर 43 मिनिटं 10 जणांसह खेळण्याचा प्रसंग ओढवला. त्यावेळी तो एखाद्या पाषाणासारखा प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमणासमोर उभा ठाकला...भारतानं हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेताना जबरदस्त झुंज दिली. त्यावेळी संघाला एकत्रितरीत्या कामगिरी करण्याच्या दृष्टीनं बांधून ठेवणारा घटक होता तो मनप्रीत सिंगच...पुढं कांस्यपदकासाठीच्या लढतीत तो महत्त्वाच्या क्षणी आडवा आल्यानं भारताला स्पॅनिश संघास अंतिम सत्रामध्ये रोखता आलं...

पॅरिसमधील खेळ हे मनप्रीतचं चौथं ऑलिम्पिक. भारतीय खेळाडूंचा विचार करता ही दुर्मिळ कामगिरी. यंदा आपल्या पाचव्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल तेवढा त्याच्या पुढं राहिलाय...पी. आर. श्रीजेशनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पडदा टाकल्यानंतर मनप्रीत देखील आता निवृत्तीची वाट धरणार का अशी चर्चा सुरू झाली होती. पण हा 32 वर्षीय खेळाडू देशासाठी आणखी खेळण्यास उत्सुक आहे. 2026 च्या हॉकी विश्वचषकात भारताचं प्रतिनिधीत्व करणं हे त्याचं पुढील लक्ष्य. त्याचबरोबर त्यानं 2028 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची शक्यताही नाकारली नाही...

‘लॉस एंजलिस खूप दूर आहे. माझं पुढील लक्ष्य आहे ते 2026 च्या विश्वचषकात पदक जिंकण्याचं. त्यादृष्टीनं फिटनेस राखण्यावर माझं लक्ष केंद्रीत असेल. जर सर्व काही ठीक चाललं, तर 2028 पर्यंत खेळत राहीन...सध्या मला शरीराची स्थिती चांगली वाटतेय आणि माझा स्वत:वर विश्वास आहे. माझा ‘गेम इंटेलिजन्स’ देखील शिखरावर आहे. देशातर्फे खेळणं हे मानसिकता आणि माझ्या मेहनतीवर अवलंबून असेल’, तो म्हणतो...मनप्रीत सिंगनं मैदानाचा निरोप घेण्याचा निर्णय कधीही घेऊ द्या, पण त्याच्या पिढीतील ‘महान मिडफिल्डर’ म्हणून त्याची नोंद कायम राहील !

काय आहे मनप्रीतची खासियत ?...

भारतीय हॉकी संघाची सूत्रं नवीन मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी स्वीकारल्यानंतर मनप्रीत सिंगची भूमिकाही बदलली...पाहण्याजोगा खेळ खेळणाऱ्या या मिडफिल्डरमध्ये ताकद लपलीय ती विरोधी बचावाला भेदण्याची आणि गोलसाठी संधी निर्माण करण्याची तसंच  स्वत: गोल करण्याची. फुल्टननी त्याच्याकडे अनेकदा ‘हायब्रिड डिफेन्सिव्ह’ भूमिका सोपविलीय अन् जालंधरच्या या खेळाडूनं ती समर्थपणे पेलताना लक्षवेधी कामगिरी करून दाखविलीय...गेल्या 12 महिन्यांत त्याची ही भूमिका चांगलीच विकसित झालीय. याबाबतीत कामी आलंय ते त्याचं उत्कृष्ट पासिंग कौशल्य, मग ते सहकारी मिडफिल्डर्सकडे देण्यात येणारे लहान पास असोत वा हवेतून तरंगत जाणारे लांब पासेस्...

थोडक्यात मनप्रीत...

  • जन्म : 26 जून, 1992...
  • पत्नीचं नाव : इली सिद्दिकी...
  • उंची : 5 फूट 7 इंच...
  • संघातील स्थान : मिडफिल्डर...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.