मुख्याध्यापकाला हाकलण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळ
शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मिसळले विष : तिघाजणांना अटक, सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथील प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला गावातून हाकलण्यासाठी राक्षसी प्रवृत्तीच्या तिघा जणांनी शाळकरी मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष घातल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथे पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली असून या घटनेच्या तपासाला कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी त्याच गावातील तिघा जणांना अटक केली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. यावेळी रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक चिदंबर मडीवाळर हे उपस्थित होते. कृष्णा महादेवी मादर (वय 26), नागनगौडा बसाप्पा पाटील (वय 27), सागर सक्राप्पा पाटील (वय 29) तिघेही राहणार हुलीकट्टी अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत.
सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक डी. एस. धर्मट्टी, उपनिरीक्षक के. एम. बन्नूर, उपनिरीक्षक एल. आर. गौडी, एस. आर. बजंत्री, यु. एच. पुजेर, एम. बी. माळल्ली, ए. आर. सारापुरे व तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नावर, सचिन पाटील आदींचा समावेश असलेल्या विशेष पथकाने 30 जुलै रोजी या त्रिकुटाला अटक करून त्यांच्याजवळून एक मोटारसायकल व विषाची बाटली जप्त करण्यात आली आहे.
14 जुलै रोजी हुलीकट्टी येथील सरकारी प्राथमिक शाळेचे अकरा विद्यार्थी टाकीतील पाणी पिऊन अत्यवस्थ झाले होते. त्यांना सौंदत्ती येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पोलीस व शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मुख्याध्यापक सुलेमान बाराइमाम घोरीनायक यांनी सौंदत्ती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीतून पाणी पिणारे विद्यार्थी अत्यवस्थ कसे झाले? टाकीतील पाण्यात विषारी पदार्थ मिसळला आहे का? याची पाहणी करताना पोलिसांना शाळेच्या आवारातच एक विषाची बाटली आढळून आली. त्यावरून प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्याध्यापक सुलेमान घोरीनायक यांना गावातून हाकलण्यासाठी गावातील तिघा जणांनी हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
सुलेमान गेल्या 13 वर्षांपासून याच शाळेत सेवा बजावत आहेत. त्यांना या गावातून हाकलण्यासाठी सागर पाटील, कृष्णा मादर व नागनगौडा पाटील या तिघा जणांनी शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत विष घालण्याचा कट रचला. 8 जुलै रोजी मुनवळ्ळी येथे जाऊन कीटकनाशकाची बाटली खरेदी करण्यात आली. विष घालण्याआधी एक दिवस 13 जुलै रोजी हे तिघेजण पुन्हा एकत्र आले. विष घालण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा वापर करण्याचा निर्णय झाला. ठरल्याप्रमाणे पाण्याच्या टाकीत विष मिसळण्यात आले. विषारी पाणी पिऊन शाळकरी मुलांचा मृत्यूच झाला तर या घटनेला जबाबदार धरून मुख्याध्यापकाची हकालपट्टी होईल, अशी त्यांची धारणा होती.
शीतपेयाच्या बाटलीत विष घालून दिली अल्पवयीन मुलाच्या हाती
शीतपेयाच्या बाटलीत विष घालून एका अल्पवयीन मुलाच्या हाती देण्यात आले. चॉकलेट व पाचशे रुपये देऊन पाण्याच्या टाकीत घालून ये, असे त्या मुलाला सांगण्यात आले होते. या बाटलीत काय आहे? अशी विचारणा त्या मुलाने केली. त्यावेळी ज्यूस आहे, पाण्याच्या टाकीत मिसळला तर पाणी चांगले होईल, असे सांगण्यात आले होते. या राक्षसी प्रवृत्तीच्या त्रिकुटावर विश्वास ठेवून त्या अल्पवयीन मुलाने पाण्याच्या टाकीत विष मिसळले. जाता जाता बाटली शाळेच्या आवारात फेकून दिली. त्या बाटलीमुळेच संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला.