For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉकी इंडिया लीगसाठी रविवारपासून खेळाडूंचा लिलाव

06:00 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॉकी इंडिया लीगसाठी रविवारपासून खेळाडूंचा लिलाव
Advertisement

एक हजारहून अधिक देशी-विदेशी खेळाडूंचा लिलावात समावेश, महिला हॉकी लीगचे प्रथमच आयोजन

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

हॉकी इंडिया लीगसाठी सुमारे एक हजारहून अधिक देशी व विदेशी हॉकीपटूंचा लिलाव 13 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत येथे होणार आहे. सात वर्षांच्या ब्रेकनंतर या लीगचे पुनरागमन होत असून त्याची व्यापकता वाढविण्यात आली आहे. पुरुषांबरोबर महिलांची लीगही प्रथमच घेतली जाणार आहे. पुरुषांचे आठ फ्रँचायजी संघ असून त्याचा लिलाव 13 व 14 ऑक्टोबर रोजी होईल तर महिला हॉकीपटूंचा लिलाव 15 ऑक्टोबर रोजी होईल, असे हॉकी इंडियाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. ‘जगातील सर्वात रोमांचक लीगपैकी एक असलेल्या या लीगचे पुनरुज्जीवन झाल्याचे या लिलावातून स्पष्ट होत नाही तर भारतात महिला हॉकीच्या प्रचार व प्रसारार्थ टाकलेले एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे,‘ असे या पत्रकात म्हटले आहे.

Advertisement

या दोन लिलावासाठी एक हजारहून अधिक हॉकीपटूंनी नोंदणी केली आहे. पुरुषांमध्ये देशातील 400 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली तर 150 हून अधिक खेळाडू विदेशी आहेत. महिलांच्या लिलावासाठी देशातील 250 व 70 हून अधिक विदेशी खेळाडूंनी नोंदणी केली आहे. पायाभूत किमतीनुसार तीन गटात खेळाडूंची विभागणी करण्यात आली असून 2 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये अशा त्यांच्या किमती असतील.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या भारताच्या पुरुष संघापासून लिलाव प्रक्रियेची सुरुवात होईल. त्यात कर्णधार हरमनप्रीत सिंग, उपकर्णधार हार्दिक सिंग, अनुभवी मनप्रीत सिंग, मनदीप सिंग यांचा समावेश असेल. माजी महान खेळाडू रुपिंदर पाल सिंग, बिरेन्द्र लाक्रमा, धरमवीर सिंग यांनीही आपली नावे नोंद केली आहेत. विदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये आर्थर व्हान डोरेन, अलेक्झांडर हेन्ड्रिक्स, गोन्झालो पीलट, जिप जान्सेन, थिएरी ब्रिंकमन, दयान कासीम यांचा समावेश आहे. महिला हॉकीपटूंचा लिलाव भारतीय महिला संघातील अव्वल खेळाडूंपासून सुरू होईल. त्यात अनुभवी गोलरक्षक सविता, कर्णधार सलिमा टेटे, उदयोन्मुख खेळाडू व ड्रॅगफ्लिकर दीपिका, सर्वाधिक सामने खेळलेल्या वंदना कटारिया, लालरेमसियामी यांचा समावेश आहे. माजी भारतीय खेळाडू योगिता बाली, लिलिमा मिन्झ, नमिता टोपो यांनीही लिलावासाठी नावे दिली आहेत. आंतरराष्ट्रीय महिलांमध्ये डेल्फिना मेरिनो, चार्लोस स्टॅपनहॉर्स्ट, मारिया ग्रॅनाटो, रॅचेल लीन्च, निके लॉरेन्झ यांनीही लिलावासाठी नावनोंदणी केली आहे. प्रत्येक संघाचा 24 खेळाडू राहणार असूत त्यात 16 भारतीय (चार ज्युनियर खेळाडू सक्तीचे) खेळाडू व 8 विदेशी खेळाडू असतील.

एचआयएल 2024-25 लीग 28 डिसेंबरपासून राऊरकेला, ओडिशा येथे सुरू होणार आहे. यातील सामने मारंग गोम्के जयपाल सिंग अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम रांची आणि बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम राऊरकेला या दोन केंद्रावर खेळविले जातील. महिला लीगची अंतिम लढत 26 जानेवारी रोजी रांचीत तर पुरुष लीगची अंतिम लढत फेब्रुवारी 1 रोजी राऊरकेला येथे खेळविली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.