जांबोटी-ओलमणी भागात लागवड अंतिम टप्प्यात
संततधार पावसामुळे भात पिकाला पोषक वातावरण : नागपंचमीपर्यंत लागवडीची कामे पूर्ण
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-ओलमणी परिसरात गेल्या महिन्याभरापासून संततधार सुरुच असल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले असून या परिसरातील भातरोप लागवड आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जांबोटी-ओलमणी परिसरासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी वर्ग भात पेरणीएवजी रोप लागवडीवर भर देत आहेत. या भागातील शेतकरी जून महिन्याच्या प्रारंभी भातरोप लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरुंची पेरणी करतो. तरुंची उगवण होऊन 20 ते 25 दिवसानंतर शेतकरी रोपांची लागवड करतात. भातरोप लागवडीसाठी शेतवडीमध्ये मुबलक पाण्याची आवश्यकता असते. यावर्षी या भागात संततधार पावसाने जून महिन्यापासून योग्यप्रकारे साथ दिल्यामुळे जुलैच्या प्रारंभापासूनच लागवडीच्या कामाला प्रारंभ केला होता. रोपाना पोषक वातावरण लाभल्यामुळे भातरोपे बहरली. सध्या या परिसरातील लागवड अंतिम टप्प्यात आली असून नागपंचमीपर्यंत लागवडीची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मजुरीचे दर भिडले गगनाला
अलीकडे यांत्रिक पद्धतीने भातरोप लागवड करण्यात येत असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भातरोप लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची आवश्यकता असल्यामुळे महिला मजुरांच्या मागणीत वाढ झाली आहे. भातरोप लागवडीसाठी परगावचे मजूर शेतवडीत दाखल होत असून मजुरीचे दर देखील गगनाला भिडले आहेत. मात्र यावर्षी शेतकरी वर्गाना आतापर्यंत मान्सूनच्या पावसाने योग्य साथ दिल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये देखील उत्साहाचे वातावरण असून भातरोप लागवडीतून जादा उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. भातरोप लागवडीनंतर या भागात भांगलणीच्या कामाना प्रारंभ होणार आहे.