१०० टक्के देशीच झाडे लावा
सांगली :
सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेने शहरातील हिरवे अच्छादन वाढवण्यासाठी आणि हवा गुणवत्ता निर्देशांक ३० पर्यंत खाली आणण्यासाठी येत्या तीन वर्षांत 'हरित संगम' उपक्रमाअंतर्गत एक लाख झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. पण शहरातील काही निसर्गप्रेमी अभ्यासकांचा १०० टक्के देशीच झाडे लावावीत, असा आग्रह होत असून, या पार्श्वभूमीवर सांगलीतील पर्यावरणप्रेमी नागरिक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत "विदेशी झाडे न लावता फक्त देशी झाडांची लागवड करावी" अशी ठाम मागणी महानगरपालिकेकडे केली आहे.
करमळ, वड, पिंपळ, जांभूळ, करंज, कडुलिंब, चिंच, आंबा, शेंद्री, कुसूम, अर्जुन, हिरडा, बेहडा यांसारखी झाडे केवळ दीर्घायुषी आणि छायादार नसून स्थानिक पक्ष्यांचे घरटे, प्राण्यांचा अधिवास आणि औषधी गुणधर्म यांमुळे पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवतात. या झाडांमुळे पाण्याचा साठा वाढतो तसेच मातीची सुपीकता टिकून राहते.
यासोबत एकसांगी लागवड (मोनोकल्चर) होणार आहे. एकाच प्रजातीची झाडे एकसलग रस्त्याने एकाच रंगाचा फुलोरा दिसावा म्हणून लावली जाणार आहे. या विरोधात देखील पर्यावरण संस्था एकवटल्या आहे. झाडे योग्य अंतरावर व वैविध्य राखून लावली गेली पाहिजेत, निसर्गही तेच सांगतो. या संदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्री सांगली, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे तबरेज खान, रोहन पाटील, कौस्तुभ पोळ, अमोल जाधव, हर्षद दिवेकर, अरविंद सोमण, विशाल कोठावळे, अनिकेत ढाले, सचिन हजारे यांनी निवेदन दिले असून, त्यात झाड लागवडीच्या आराखड्यात तातडीने बदल करण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले आले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, देशी झाडे लावल्यारा शहराचे खरेखुरे हरितीकरण होईल. दीर्घकाळ टिकणारे व पर्यावरणपूरक प्रदेशनिष्ठ वृक्षलागवड होईल. पर्यावरणवादी संस्थांच्या मते, जर खरोखरच लाख झाडांची लागवड यशस्वी व्हायची असेल, तर ती देशी झाडांच्या आधारेच करावी लागेल. अन्यथा लाख झाडे लावूनही फायदा होणार नाही. या संपूर्ण घडामोडीमुळे सांगलीकरांचे लक्ष आता महानगरपालिकेकडे लागले आहे. निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन खऱ्या अर्थाने हिरवळ वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
- पडीक भूखंडावर देशी वृक्षांची नर्सरी करा
शासकीय नर्सरीमध्ये देशी वृक्ष प्रकारांची व लागवडीची कॅपॅसिटी वाढवावी लागेल. ग्रामपंचायत असो वा नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचेकडे असलेल्या पडीक भूखंडावर देशी वृक्षांची नर्सरी करण्यात यावी. जेणेकरून व क्षारोपण व रोपां करिता इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
-तबरेज खान, अध्यक्ष, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी
- सांगलीने दुष्परिणाम अनुभवलेत
मोनोकल्चर म्हणजे एकाच प्रजातीची एकसलग झाडे आणि विदेशी झाडे लावणे. हे दोन्ही निसर्गनियमांविरुध्द आहे. विदेशी झाडांचे दुष्परिणाम सांगलीने अनुभवलेले आहेत. स्थानिक जैवविविधतेला उपयोगी प्रदेशनिष्ठ झाडे लावली जावित. माणसाला सगळं मिळालं आहे. त्यामुळे सुशोभिकरणाची खरी व्याख्या पर्यावरणीय घटकांना संभाळणे हीच आहे.
-रोहन पाटील, वनस्पती व देवराई अभ्यासक
- नागरिकांमध्ये जनजागृती करू
जर महापालिकेने विदेशी झाडे लावण्याचा निर्णय लवकर बदलला नाही तर या विरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करून आंदोलन करण्यात येईल. तसेच आयुक्त गांधीना गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून रोज एक देशी झाड भेट देण्यात येईल.
-कौस्तुभ पोळ, पर्यावरण प्रेमी