बेळगावात कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा मानस
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, यमनापूर येथे स्मार्टकार्डचे वितरण
बेळगाव : कामगार विभागांतर्गत येणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा मानस आहे. बेळगाव जिल्हा संपूर्ण कर्नाटकात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दृष्टीने बेळगावसाठी तीन कामगार शाळा मंजूर करण्याची कामगार मंत्र्यांकडे विनंती केली आहे. काँग्रेस पक्ष केंद्रात किंवा राज्यात सत्तेवर येतो तेव्हा महिला, कामगार, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येतात, असे मत महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. कामगार विभागातर्फे यमनापूर औद्योगिक क्षेत्रात तात्पुरत्या गृहसंकुलाचे उद्घाटन व जिल्ह्यातील असंघटित कामगारांसाठी स्मार्टकार्ड वितरण करून त्या बोलत होत्या.
यावेळी कामगार मंत्री संतोष लाड, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, मंत्री संतोष लाड यांनी जेव्हापासून कामगार विभागाची सूत्रे स्वीकारली आहेत, तेव्हापासून कामगार विभाग संघटित व असंघटित कामगारांसाठी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. आता बेळगाव ग्रामीण भागातील अनेक कामगारांनी त्यांच्या कामगार कार्डचे नूतनीकरण केलेले नाही. यामुळे कामगार कार्ड नूतनीकरण प्रक्रिया सोपी करण्याची विनंती त्यांनी कामगार मंत्र्यांकडे केली. यावेळी आमदार आसिफ सेठ, बाबासाहेब पाटील, उपायुक्त नागेश बी. जी., साहाय्यक संचालक उमेश ए. एच., कार्यनिर्वाहक अधिकारी भारती, विजयकुमार पाटील, मुंडरगी नागराज व कामगार उपस्थित होते.