जिल्ह्यात राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभांचे नियोजन
कोल्हापूर :
राज्यात गेल्या अडीच वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्वच दहा विधानसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीमध्ये चुरशीची निवडणूक होत आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजप व काँग्रेसकडून राष्ट्रीय स्तरावरील प्रभावी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितिन गडकरी, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तर काँग्रेसकडून कुस्तीपटू विनेश फोगाट, सचिन पायलट, खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या सभांचे नियोजन सुरु आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. चार प्रमुख पक्षांचे सहा पक्ष झाल्याने सर्वच पक्ष आपले अस्तित्व दाखविण्यासाठी ताकदीनिशी निवडणूक लढत आहेत. राज्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याने राज्यातील सर्वच पक्षांमधील मातब्बर, प्रभावी नेते त्यांच्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरु आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांची सायंकाळी इचलकरंजी येथे सभा होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखिल आज शुक्रवार, 8 रोजी कोल्हापूरमध्ये येणार असून ते डॉक्टर, वकील यांच्याशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 12 रोजी तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यी सभा 16 रोजी होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभेचे नियोजन महायुतीकडून सुरु आहे. तर मविआकडूनही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अन्य काही राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे आयोजन आहे.