जांबोटी भागातील बससेवेचे तीनतेरा!
नियोजनाची गरज : अवेळी-एकाचवेळी धावणाऱ्या बस फेऱ्यामुळे विद्यार्थी-प्रवासी वर्गाची गैरसोय : जांबोटी-खानापूर शटल बसची मागणी
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी विभागातील बस सेवेचे नियोजन पूर्ण पणे कोलमडले असून, जांबोटी-खानापूर मार्गावर अनेक बसफेऱ्या एकाचवेळी व अवेळी धावत असल्यामुळे अयोग्य नियोजनामुळे प्रवासी, विद्यार्थी वर्गांचे हाल होत आहेत. खानापूर आगाराने या भागातील बस सेवेचे योग्य नियोजन करून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. जांबोटी-कणकुंबी विभागासाठी खानापूर आगारामार्फत जांबोटी, आमटे, चापोली, पारवाड, चिगुले, तळेवडे, गवसे, चिखले आदी गावासाठी बससेवा सुरू केल्या आहेत.
मात्र खानापूर आगराच्या अयोग्य नियोजनामुळे सर्व बस सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून या भागातील अनेक बसफेऱ्या अयोग्य वेळी धावत असल्यामुळे विद्यार्थी व प्रवासी वर्गांची गैरसोय होत आहे. या भागात धावणाऱ्या चापोली, आमटे, तळावडे, गवसे या चार बसफेऱ्या खानापूर बसस्थानकावरून सकाळी 7.30 ते 7.45 दरम्यान एकाचवेळी जांबोटीकडे मार्गस्थ होत असल्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने या बससेवा कूचकमी ठरल्या आहेत. चार बसेस एकाचवेळी धावत असल्याने या बसना मोजकेच प्रवासी असतात. त्यामुळे प्रवाशाअभावी परिवहन मंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत असून, प्रवाशांना देखील पुढील बसच्या प्रतीक्षेत 10.30 पर्यंत तासनतास ताटकळत थांबावे लागते. तसेच दुपारी 2.30 ते 4.15 या वेळेत तीन बसेस खानापूरहून जांबोटीकडे मार्गस्थ होतात. त्यानंतर रात्री 7.30 वाजेपर्यंत खानापूरहून जांबोटीकडे जाण्यासाठी एकही बस नसल्याने प्रवाशांचे बरेच हाल होत आहेत.
तसेच जांबोटी येथून खानापूरकडे जाण्यासाठी सकाळी 6.45 नंतर 9.30 ते 10.30 या वेळेत एकाचवेळी चार बस धावत असल्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने या बसेस कूचकमी ठरल्या आहेत. जांबोटीहून खानापूरला जाण्यासाठी 11 ते 1:30 पर्यंत एकही बस नसल्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. सायंकाळी 5.30 वाजता बस सोडा वास्तविक जांबोटी खानापूर मार्गावर साधारणपणे 15 ते 20 गावांचा समावेश असल्यामुळे प्रवासी व विद्यार्थी वर्गांचा मोठा प्रतिसाद मिळतो.
या भागातील अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बेळगाव व खानापूर येथे नियमित ये-जा करतात. मात्र खानापूरपासून जांबोटीकडे जाण्यासाठी सायंकाळी 4.15 वाजताची एकमेव बस असल्यामुळे बेळगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग व बाजारहाटसाठी सायंकाळी गावाकडे परतणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. गावाकडे परतणारे विद्यार्थी सायंकाळी 5 वाजल्यानंतर जांबोटी क्रॉसवर खासगी वाहनांच्या प्रतीक्षेत थांबत असल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. याचा आर्थिक भुर्दंड मात्र सोसावा लागतो. रात्री 7.45 पर्यंत बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत असल्यामुळे विशेषता महिला वर्ग व लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत. तरी खानापूर आगार प्रमुखांनी खानापूर-जांबोटी अशी 5.30 वाजता जादा बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
जांबोटी खानापूर शटल बससेवा सुरू करण्याची मागणी
जांबोटी खानापूर मार्गावर अनेक बससेवा सुरू आहेत. मात्र या बस सेवेपैकी केवळ सकाळी साडेदहा वाजताची एकमेव बस फेरी जांबोटी-खानापूर या मार्गावर धावते. उर्वरित सर्व बसेस खानापूरवरून कणकुंबी भागातील गावासाठी सुरू आहेत. यापैकी बहुतांश बसेस केवळ सकाळी, सायंकाळी धावत असल्यामुळे सकाळी 11 पासून सायंकाळी 5 पर्यंत खानापूरला जाण्यासाठी बसेसचा वाणवा असल्यामुळे प्रवासी वर्गांना दिवसभर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत असल्याने गैरसोय होते.
प्रवासी-विद्यार्थ्यांना दिलासा द्या
वास्तविक पाहता जांबोटी हे महसूल विभागाचे मुख्यालय असल्याने शासकीय कामकाजासाठी गर्लगुंजी, इदलहोंड आदी ठिकाणच्या सुमारे 40 गावच्या नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. मात्र अपुऱ्या बसअभावी नागरिकांचे हाल होतात. सध्या या मार्गावरील खासगी प्रवासी वाहतूक देखील पूर्णपणे बंदच असल्यामुळे बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी खानापूर-जांबोटी-खानापूर अशी दिवसभर शटल बससेवा सुरू करून गैरसोय दूर करावी अशी मागणी या भागातील प्रवासी व नागरिकांमधून होत आहे. तरी खानापूर आगार प्रमुखांनी लक्ष घालून जांबोटी विभागातील बसेसचे कोलमडलेले नियोजन सुरळीत करून प्रवासी व विद्यार्थी वर्गांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.