चीनच्या धावपट्टीवरून घसरले विमान
टेक-ऑफवेळी विमानात लागली आग : दुर्घटनेत 40 प्रवासी जखमी
वृत्तसंस्था /चोंगकिंग
चीनच्या चोंगकिंग विमानतळावर गुरुवारी सकाळी तिबेट एअरलाइन्सच्या एका विमानात आग लागली आहे. दुर्घटनेत किमान 40 प्रवासी जखमी झाले आहेत. चोंगकिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान टेक-ऑफदरम्यान धावपट्टीवरून घसरले, यामुळे विमानात आग लागली.
विमानात दुर्घटनेवेळी 113 प्रवासी आणि चालक दलाचे 9 सदस्य होते. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. बचावपथकाने विमानातील आग विझवून धावपट्टीचे क्षेत्र प्रतिबंधित केले आहे.
चीनच्या चोंगकिंग येथून तिबेटच्या न्यांगची येथे हे विमान जात होते. या दुर्घटनेत काही प्रवाशांना किरकोळ ईजा झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे तिबेट एअरलाइन्सकडून सांगण्यात आले.
यापूर्वी चीनच्या गुआंग्शीमध्ये चाइना ईस्टर्न पॅसेंजर एअरलाइन्सचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत 123 प्रवासी आणि चालक दलाच्या 9 सदस्यांना जीव गमवावा लागला होता. 2021 या वर्षात जगभरात विमानांच्या 15 जीवघेण्या दुर्घटना घडल्या असून यात 134 जणांचा बळी गेला आहे. सर्वात मोठी दुर्घटना ही श्रीविजय एअर बोइंग 737-500 विमानाची इंडोनेशियात घडली होती. 9 जानेवारी 2021 रोजी झालेल्या या विमान दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला होता.