ब्राझीलमध्ये इमारतीला धडकले विमान, 10 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ .ब्राझिलिया
ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात एक विमान दुर्घटना झाली असून यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. एक छोटे विमान घराला आणि नंतर इमारतीला जाऊन धडकले, यानंतर हे विमान एका दुकानावर कोसळले आहे. या दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
ग्रामाडो हे पर्यटनस्थळ असल्याने तेथे लोकांची मोठी गर्दी असते. विमान कोसळल्याने तेथे काही काळासाठी अफरातफरीची स्थिती निर्माण झाली. संबंधित विमानातून ब्राझिलियन उद्योजक कुटुंबीयांसोबत प्रवास करत होता. हे एक खासगी विमान होते, याचे सारथ्य उद्योजक लुइज क्लाउडियो गॅलियाजी करत होते. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी, तीन मुली आणि अन्य कुटुंबीय मृत्युमुखी पडले आहेत. 61 वर्षीय गॅलियाजी हे स्वत:च्या कुटुंबाला ट्रिपवर घेऊन जात होते. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.