शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील सुरक्षारक्षक बदलण्याचा घाट
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
शिंगणापूर येथील जि.प.च्या क्रीडा प्रशालेमध्ये जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे 7 सुरक्षा रक्षक (पहारेकरी) गेले वर्षभर कार्यरत आहेत. सीईओ कार्तिकेयन एस व शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना सुरक्षा रक्षक पुरविण्याबाबत दिलेल्या पत्रानुसार ही नियुक्ती केली होती. त्यानुसार संबंधित सुरक्षा रक्षकांकडून गेले वर्षभर विनातक्रार कामकाज सुरु आहे. तरीही क्रीडा प्रशालेचे प्रशासन अधिकारी समरजीत पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील एका सहकारी संस्थेस सुरक्षा रक्षक पुरविण्याचा ठेका दिला आहे. मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची सेवा 1 एप्रिलपासून कायमस्वरूपी बंद केली जाणार आहे. त्यामुळे कार्यरत सुरक्षा रक्षक हवालदिल झाले असून नवीन सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीचा घाट कशासाठी? असा प्रश्न जि.प.वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषद संचलित करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेमध्ये 1 एप्रिल 2024 पासून सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष विशाल घोडके यांच्यामार्फत पहारेकरींची सेवा पुरविण्यात येत आहे. पण सीईओ कार्तिकेयन एस यांनी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बाह्य संस्था निश्चितीकरण करण्याबाबत सूचित केले असल्याचे क्रीडा प्रशालेच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे सहाय्यक कामगार आयुक्तांना कळविले आहे. त्यानुसार प्रशासनाधिकाऱ्यांनी किसानपुत्र सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार सहकारी संस्था शिरढोण, ता. शिरोळ या संस्थेस सुरक्षा रक्षक पुरविण्याबाबत काम वाटप केले. त्यामुळे या संस्थेकडून 1 एप्रिलपासून नियमितपणे पहारेकरी हजर करून सेवा देणार आहेत. त्यामुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडील पहारेकरींची सेवा कायमस्वरूपी बंद केली जाणार आहे, असे क्रीडा प्रशालेच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना पत्राद्वारे कळविले. जर सुरक्षा रक्षक मंडळाचे पहारेकरी चांगली सेवा देत असतील तर त्यांचे काम बंद करून पुन्हा सहकारी संस्थेमार्फत नवीन पहारेकरी नियुक्त करण्यामागे कोणते कारण दडले आहे? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.
- तर न्यायालयात दाद मागावी लागेल
शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती क्रीडा प्रशाला ही कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीत आहे. शासकीय आस्थापना नोंदीत असेल तर महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरी नियम कल्याण अधिनियम 1981 योजना 2012 च्या खंड 25 च्या आदेशानुसार या क्रीडा प्रशालेत जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडील सुरक्षा रक्षक घेणे अपेक्षित आहे. पण प्रशालेच्या प्रशासनाधिकाऱ्याकडून या आदेशाचे उल्लंघन केल्यास आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेने दिला आहे.
- अधिकाऱ्यांना चुकीची माहिती सांगणारी यंत्रणा कार्यान्वित
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये बाह्यस्त्राsताद्वारे नियुक्त केलेले काही कर्मचारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती सांगून आपल्याला अपेक्षित असलेले काम करून घेण्यात पटाईत आहेत. शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील जिल्हा सुरक्षा रक्षकांचे काम बंद करून त्या ठिकाणी दुसऱ्या संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक घेण्याचा ‘माईंड गेम’ देखील त्यांनीच खेळला असल्याची शिक्षण विभागात चर्चा आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या झारीतील शुक्राचार्यांना वेळीच ओळखून त्यांना बाजूला करण्याची गरज आहे.
- जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडील पहारेकरींची नियुक्ती ही खर्चिक बाब
जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडील पहारेकरींच्या पगारापोटी शिक्षण विभागाची खूप मोठी रक्कम खर्च होते. त्याऐवजी अन्य संस्थेकडून सुरक्षा रक्षक घेतल्यास खर्चामध्ये सुमारे 8 ते 9 लाखांची बचत होणार आहे. त्यामुळेच जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडील पहारेकरी बंद करून त्या ठिकाणी अन्य संस्थेमार्फत पहारेकरींची नियुक्ती करण्याचा बैठकीत निर्णय झाला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
- प्रशालेमध्ये जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे पहारेकरी घेणे बंधनकारक
शिंगणापूर येथील क्रीडा प्रशाला ही कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीत आहे. तेथे नियमानुसार सुरक्षा रक्षक मंडळाचे पहारेकरी घ्यावे लागतात. त्यामुळे तेथे सध्या कार्यरत असणाऱ्या 7 पहारेकऱ्यांना कमी करून अन्य खासगी अथवा सहकारी संस्थेमार्फत पहारेकरी नियुक्त करता येणार नाहीत.
विशाल घोडके, सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर