For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शैक्षणिक सहलींचे नोव्हेंबरमध्येच नियोजन करा

10:24 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
शैक्षणिक सहलींचे नोव्हेंबरमध्येच नियोजन करा
Advertisement

ताण कमी करण्यासाठी परिवहनचे शाळांना आवाहन

Advertisement

बेळगाव : बसवरील ताण कमी करण्यासाठी शैक्षणिक सहलींचे नियोजन नोव्हेंबर महिन्यातच करावे, असे आवाहन परिवहन मंडळाने केले आहे. डिसेंबर महिन्यात अधिवेशन आणि इतर कार्यक्रमांसाठी बससेवेवर अतिरिक्त ताण वाढणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये सहलींसाठी बसेसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी नोव्हेंबरमध्येच शाळांनी शैक्षणिक सहलींचे नियोजन करावे, असे परिवहनने कळविले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात विविध शाळांच्या शैक्षणिक सहली निघतात. दरम्यान, या सहलींसाठी परिवहनच्या बसलाच प्राधान्य दिले जाते. मात्र, गतवर्षीपासून शक्ती योजना सुरू झाली आहे. त्यामुळे बसवर महिला प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. त्यातच पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आणि इतर कार्यक्रमांसाठी बसेस बुक केल्या जातात. पोलीस आणि मंत्र्यांच्या ताफ्यासाठी बसेसची अधिक गरज असते. त्यामुळे डिसेंबरमध्ये शैक्षणिक सहलींसाठी बस उपलब्ध करताना अडचणी निर्माण होणार आहेत.

यासाठी शाळांनी नोव्हेंबरमध्येच शैक्षणिक सहली काढण्यावर भर द्यावा, असे सांगण्यात आले आहे. परिवहनकडून शैक्षणिक सहलींसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. राज्यात 45 रु. प्रतिकिलोमीटर तर इतर राज्यात 50 रुपये प्रतिकिलोमीटर भाडे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी दहा दिवस अगोदर बस बुकिंग करणे आवश्यक आहे. शाळेचे पत्र आणि इतर बाबी पूर्ण केल्यानंतर परिवहनकडून बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांना पर्यटनस्थळे व इतर धार्मिकस्थळे दाखविली जातात. त्यामध्ये म्हैसूर, बेंगळूर, श्रवणबेळगोळ, धर्मस्थळ, हंपी, बदामी यासह पंढरपूर आणि गड-किल्ल्यांचे दर्शन घडवले जाते. यासाठी शाळांकडून परिवहनची बस बुकिंग केली जाते. नोव्हेंबरपेक्षा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बुकिंग अधिक प्रमाणात वाढते. मात्र, परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा आहे. त्यातच अधिवेशन व इतर कामांसाठी बसेस लागणार आहेत. तरी शाळा व्यवस्थापकांनी नोव्हेंबर महिन्यात शैक्षणिक सहली काढण्यावर भर द्यावा, असे आवाहन परिवहनने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.