आंतरराज्य टेन रेड स्नूकर स्पर्धेत कोल्हापूरचे पीयूष लिंबड विजेते
बेळगावमधील झीरो प्लस वन बीटस् स्नूकर अॅकॅडमीतर्फे आयोजन : बेळगावचे चेतन धोत्रे उपविजेते
कोल्हापूर : बेळगाव येथे आंतरराज्यस्तरावर आयोजित केलेल्या टेन रेड ओपन स्नुकर कॉम्पीटिशनच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचे स्नुकरपटू पियुष लिंबड यांनी बेळगावचे स्नुकरपटू चेतन धोत्रे यांना 3-0 फ्रेमने पराभूत करत विजेतेपद पटकावले. विजेतेपद पटकावताना इक्झीक्युशन वुईथ परफेक्शन असे खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची पियुष यांनी मने जिंकली. प्रतिस्पर्धी चेतन यांनीही शैलीदार खेळ करत अंतिम सामन्यात चुरस आणली होती .नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बेळगावमधील झीरो प्लस वन बीटस् स्नुकर अॅकॅडमीने स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, बेळगाव, गोकाक, हुबळी, धारवाड, हल्ल्याळ येथील 96 स्नुकरपटूंनी प्रतिनिधीत्व केले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक राज्यस्तरावर रँक मिळवलेल्या अनेक स्नुकरपटूंचा समावेश होता. स्पर्धेतील सहभागी स्नुकरपटूंपैकी प्रत्येकी 24 जणांचा एक याप्रमाणे चार गट बनवले होते.
प्रत्येक गटात बाद पद्धतीने झालेले सामने जिंकत बेळगावचे अभिजीत मोरे यांनी ए गटातून, बेळगावचे प्रकाश शिंदे यांनी बी गटातून, बेळगावचे चेतन धोत्रे यांनी सी गटातून आणि कोल्हापूरचे पियुष लिंबड यांनी डी गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. प्रकाश शिंदे यांच्याशी पियुष लिंबड यांचा पहिला उपांत्य सामना झाला. यात पियुष यांनी प्रकाश यांना 3-0 अशा सलग फ्रेमने पराभूत करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात चेतन धोत्रे यांनी अभिजीत मोरे यांना 3-1 फ्रेम फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पियुष व चेतन यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये पियुष यांनी भारी पडत चेतन यांना 3-0 अशा सलग फ्रेमने मात देत स्पर्धा विजेतेपद पटकावले. बक्षीस वितरण समारंभात स्पर्धा विजेते पियुष यांना 15 हजार ऊपये व चषक तर उपविजेते चेतन यांना 7 हजार ऊपये व चषक असे बक्षीस देऊन गौरवले. तसेच उपांत्य फेरीतील पराभूत प्रकाश शिंदे व अभिजीत मोरे यांनाही प्रत्येकी 2 हजार ऊपये व चषक असे बक्षीस देऊन गौरवले.