‘पिटबुल’ कुत्रा पाळताय, सावधान!
हणजूण येथील पिटबुलच्या मालकास अटक : पिटबुलने घेतला होता सात वर्षांच्या मुलाच बळी
म्हापसा : हणजूण येथे गुरुवारी एका ‘पिटबुल’ जातीच्या कुत्र्याच्या जीवघेण्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर काल शुक्रवारी पोलिसांनी कुत्र्याचा मालक अब्दुल कादर ख्वाजा याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे. या कुत्र्याने सात वर्षीय प्रभास प्रेमानंद कळंगुटकर या बालकावर हल्ला करत चेहरा, गळ्यावर तसेच मानेवर चावा घेत अक्षरश: तोंडाची चिरफाड केली होती. ही घटना गुऊवारी घडली होती. कुत्र्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले.
परंतु, उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिटबुल कुत्र्याचा मालक अब्दुल कादर ख्वाजा याला अटक झाली आहे. प्रभासची आई गरीब असून ती घरकाम करते. गुऊवारी तिने मुलाला आपल्यासोबत कामावर नेले होते. हणजूण येथे आपल्या घराशेजारीच ती घरकामास गेली. तिथे असलेल्या पिटबुल कुत्र्याने या मुलावर अचानक हल्ला चढविला आणि त्याचा बळी घेतला. हणजूण पोलिसस्थानकाचे निरीक्षक सुरज गावस याप्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी अब्दुलच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
‘पिटबुल’ जातीचा कुत्रा पाळण्यात बंदी!
पिटबुल जातीचा कुत्रा हिंसक आणि आक्रमक असतो. त्यामुळे जगातील बहुतेक देशांमध्ये हा कुत्रा पाळण्यावर बंदी आहे. आपल्या देशात आणि गोव्यातही हा कुत्रा पाळण्यास बंदी आहे. तरीही काहीजण चोरवाटेने हे कुत्रे विकतात आणि बरेच लोक ते कुत्रे विकत घेऊन आपली श्रीमंती इतरांसमोर मिरवितात. मात्र हे कुत्रे घातक असून इतरांचे सोडाच कधी कधी स्वत:च्या घरामधीलही व्यक्तींचा बळी घेऊ शकतात, अशी माहिती श्वान प्रशिक्षक स्टेनली ब्रागांझा, यांनी दै. तऊण भारतशी बोलताना दिली.