Karad Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून कराडमध्ये पिस्टल जप्त!
कराड शहरातील गुन्हेगारी टोळी नष्ट करण्यासाठी पोलिसांची कारवाई
कराड : येथील गुरूवार पेठेतील दर्गा मोहल्लात पान शॉपशेजारी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुस जप्त केले. बुधवारी २६ रोजी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिस्टल, जिवंत काडतुस असा ६६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. साद आशपाक मुलाणी (वय २३, रा. आयेशा कॉम्पलेक्स, रूम नं.१६, आझाद चौक, कराड) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राजश्री पाटील यांनी शहरातील गुन्हेगारी टोळ्या व गटातटांचा नाश
करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूत्रांकडून गुरूवार पेठेतील दर्गा मोहल्ला शेजारी नाझ पान शॉप शेजारी एकजण पिस्टल घेऊन बाबरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तेथे सापळा रचून साद मुलाणीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुस मिळून आले. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी केली.