उचगाव तरुणांकडून पिस्टल, रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जप्त
एक लाखाचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरची कारवाई
उचगाव/प्रतिनिधी
उचगाव ता.करवीर येथे हत्यारे विक्री साठी आणताना रोहन रुपेश पाटील, वय २० वर्षे, रा. विठलाई कॉलनी, मणेरमळा, उचगाव या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून एक पिस्टल, एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत राऊंड असा एक लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही घटना गुरुवारी उचगाव माळीवाडा येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पथकातील वैभव पाटील यांना बातमी मिळाली की, उचगाव येथे राहणारा रोहन पाटील याचेकडे पिस्टल , रिव्हॉल्वर असून तो माळीवाडा, उचगाव येथे कोणाला तरी विक्री करणेसाठी येणार आहे. पथकाने माळीवाडा उचगाव येथे सापळा रचून रोहन रुपेश पाटील, वय २० वर्षे, रा. विठलाई कॉलनी, मणेरमळा, उचगाव, ता. करवीर हा मिळून आला. त्याचे कब्जातून एक पिस्टल,एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत राऊंड असा एकूण १,०१,०००/- रूपये किंमतीच्या वस्तु हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रविण पाटील, प्रदिप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांनी सहभाग घेतला.
रोहन पाटील याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून ही हत्यारे कोणाकडून व कोणत्या उद्देशासाठी आणल्या आहेत याबाबतचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करीत आहे.