शाळांना जमीन देण्याची पिरनवाडी ग्रामस्थांची मागणी
बेळगाव : पिरनवाडी नगरपंचायतीच्या अखत्यारित सरकारी कन्नड मॉडेल शाळा, सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, सरकारी उर्दू उच्च प्राथमिक शाळा आहे. तथापि शाळेच्या आजूबाजूंची घरे आणि लोकसंख्या तिन्ही शाळांमधील मुलांसाठी दाट लोकवस्तीची असून, जांबोटी-गोवा महामार्ग आहे. अनेकवेळा अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने शासनाने आरएस क्रमांक 21 मधील 5 एकर जागा तिन्ही शाळांसाठी तर 2 एकर जागा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पिरनवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.
पिरनवाडी येथील रस्त्यांवर नेहमीच वर्दळ असते. यामुळे या तिन्ही शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येत असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तिन्ही शाळांना स्वत:चे सुरक्षा कंपाऊंड नसून, शाळेच्या परिसरात अनधिकृत पार्किंग केले जाते. दररोज आणि नेहमीच वाहनांची आणि जनतेची गर्दी यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यासाठी आरएस क्रमांक 21 मधील 5 एकर जमीन तिन्ही शाळांना समानरित्या देण्यात यावी. तर उर्वरित 2 एकर जागा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.