मोटारसायकली चोरणाऱ्या पिरनवाडीच्या चौकडीला अटक
सव्वादोन लाखांच्या सहा मोटारसायकली जप्त
बेळगाव : मोटारसायकली चोरणाऱ्या एका चौकडीला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मलिकजान ऊर्फ बाब्या फारुख बुडन्नावर (वय 19), आफताब ऊर्फ आप्या महंमदहनीफ अत्तार (वय 25), सैफअली ऊर्फ चकोल्या गौसमोदीन कालकुंद्री (वय 20), अन्सार ऊर्फ ब्लॅक डॉन बाबाजान खाजी (वय 28) चौघेही राहणार पिरनवाडी अशी त्यांची नावे आहेत. मलिकजान, सैफअली व अन्सार हे तिघे जण फॅब्रिकेशनचे काम करतात. तर आफताब हा ट्रकचालक आहे.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक एल. एस. जोडट्टी, उपनिरीक्षक आदित्य राजन, उपनिरीक्षक श्वेता, एम. बी. कोटबागी, श्रीकांत उप्पार, महेश नायक, आनंद कोटगी आदींनी ही कारवाई केली आहे. गेल्या रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी पिरनवाडी भाजी मार्केटजवळच एका दुकानासमोर उभी करण्यात आलेली केए 22 ईजी 7393 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकलची चोरी झाली होती. 10 फेब्रुवारी रोजी आनंद जयवंत चौगुले, रा. खादरवाडी यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना पिरनवाडी येथील चौघा जणांना अटक करून त्यांनी चोरलेल्या एकूण सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.