For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिरनवाडी-किणये रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक

10:22 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
पिरनवाडी किणये रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
Advertisement

रस्त्यावर वारंवार अपघातांच्या घटना : स्थानिकांच्या जीवितास धोका : रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : भरधाव वाहनांवर कारवाईची गरज

Advertisement

वार्ताहर/किणये

पिरनवाडी ते किणयेपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्यावरून सुसाट वाहने जातात. यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. या अपघातांमध्ये स्थानिक नागरिकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत व वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे. बेळगाव-चोर्ला रोड, पिरनवाडी-किणयेमार्गे ये-जा करण्यासाठी वाहनधारक या रस्त्याचा अधिक प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर रोज मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची वर्दळ सुरू असते. मात्र गोव्याला ये-जा करणारी वाहने भरधाव धावतात. ती अशा पद्धतीने धावतात की आजूबाजूच्या दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेलाच जावे लागते. तसेच पादचाऱ्यांना मात्र जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून जावे लागत आहे. रस्त्यावर अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. याला कारणीभूत भरधाव वाहने व रस्त्यावर असणारे खड्डेच आहेत, असे अनेकांचे म्हणणे आहे.

Advertisement

पिरनवाडीपासून ते किणयेपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी या रस्त्यावर पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र सदर पॅचवर्कचे केवळ सोंगच करण्यात आले असल्याच्या तक्रारी या भागातील वाहनधारक व नागरिकांतून होत आहेत. कारण पॅचवर्क केल्याच्या अवघ्या आठच दिवसात पुन्हा त्या ठिकाणी जैसे थे खड्डे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मग असे कामकाज करणाऱ्या कंत्राटदारांना जाब विचारणार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव-चोर्लामार्गे गोव्याला ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची संख्या तर मोठ्या प्रमाणात असतेच. याशिवाय पिरनवाडी, हुंचेनहट्टी, बाळगट्टी, बामणवाडी, नावगे, कुट्टलवाडी, मच्छे, संतिबस्तवाड, वाघवडे, मार्कंडेयनगर, रणकुंडेये, शिवनगर, बहाद्दरवाडी, कर्ले, किणये, उचवडे, बैलूर व पश्चिम भागातील वाहनधारकांची वर्दळही या रस्त्यावरून असते.

यापूर्वी किणये रस्त्यावरील पुलाजवळ टँकरने जोराची धडक दि ल्यामुळे किणये गावातील एका शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. तसेच संतिबस्तवाड क्रॉसजवळही एका शेतकऱ्याची म्हैस अपघातात ठार झाली आहे. जानेवाडी, शिवनगर, नावगे, किणये, संतिबस्तवाड आदी गावातील दुचाकीवरून येणाऱ्या तऊणांचे बळी या रस्त्यावर गेले आहेत. त्यामुळे आतातरी प्रशासनाला जाग येण्याची गरज आहे. वाहनधारकांसाठी शॉर्टकट म्हणून गोव्याला ये-जा करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरत आहे. मात्र हाच रस्ता स्थानिक नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे. ह्या रस्त्याच्या आजूबाजूला गावे वसलेली आहेत. या गावांमध्ये रस्त्याच्या बाजूला शाळा, विविध प्रकारची कार्यालये आहेत. त्यामुळे स्थानिकांची वर्दळ रस्त्यावर असतेच. मग सुसाट धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

एक तरुण मुलगा गमावल्याचे दु:ख प्रशासनाला कसे समजणार?

गेला पंधरा-सोळा दिवसांपूर्वी कामावरून बेळगावहून किणये गावाला आमचा पुतण्या सुरेश पाटील हा दुचाकीवरून येत होता. त्याचवेळी गोव्याहून बेळगावकडे भरधाव ट्रक जात होता. त्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि आमच्या पुतण्याला समोर जोराची धडक दिली. या अपघातांमध्ये सुरज याचा निष्पाप बळी गेला. आमच्या कुटुंबीयांनी एक तरुण मुलगा गमावला आहे. याचे दु:ख सांगायचे कुणाला? त्याचबरोबर अशा कितीतरी अपघातांच्या घटना या रस्त्यावर घडलेल्या आहेत. ज्यांची तरुण मुलं या रस्त्यावर बळी गेली आहेत. त्या आई-वडिलांना याचे दु:ख माहीत होणार. प्रशासनाला जाग मात्र येणार नाही. वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांवर सर्वात आधी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कारण ज्या ठिकाणी गाव, शाळा आहेत त्या ठिकाणी वेगमर्यादा असते. मग या वेगमर्यादेचे पालन का होत नाही? पोलीस प्रशासन गप्प का राहते. बेळगाव भागात ठिकठिकाणी वेगमर्यादा तपासण्यासाठी पोलीस येतात. मग अशा ग्रामीण भागातही वेगमर्यादा तपासण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहीम राबवायला हवी.

- अनिल पाटील, किणये

Advertisement
Tags :

.