केबलसाठी उद्यमबाग परिसरात पाईप बसविण्यास सुरुवात
तिसरे रेल्वेगेट ते बेम्कोपर्यंत रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट ते उद्यमबागपर्यंतच्या रस्त्याचे सुमारे 10 कोटी रुपयांच्या अनुदानातून काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे रस्ताकाम सुरू करण्यापूर्वी केबलसाठी लागणारी पाईप घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाईप घालण्यासाठी उद्यमबाग येथील मुख्य रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. यासाठी दुभाजक फोडण्यात आला असून त्यामुळे वायर तुटल्याने या मार्गावरील पथदीप बंद झाले आहेत. तिसरे रेल्वेगेट ते बेम्कोपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी तुंबत आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वीच उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. यानंतर आता 10 कोटी रुपयांच्या अनुदानातून तिसरे रेल्वेगेट ते उद्यमबागपर्यंतचा मुख्य रस्ता देखील काँक्रिटचा केला जाणार आहे.
तत्पूर्वी केबलसाठी लागणारी पाईप घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे खोदकाम करून पाईप घातल्या जात आहेत. पाईपवर काँक्रिट घालण्यात येत आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून खानापूर व गोव्याकडे जाणारी वाहने याच मार्गावरून ये-जा करत असतात. मात्र, या मार्गावर पावसाळ्यात फूटभर पाणी तुंबत आहे. त्यामुळे रस्ता करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. सदर रस्त्याची उंची वाढल्यास पाणी औद्योगिक वसाहतीत शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याची उंची वाढविण्याऐवजी सध्याचा रस्ता खोदून त्यावर काँक्रिट घालण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. पाईप घालण्यासाठी दुभाजक फोडण्यात आला आहे. मात्र, दुभाजक फोडताना त्यामधून गेलेल्या केबल तुटल्याने फौंड्री क्लस्टर ते बेम्कोपर्यंतचे पथदीप बंद झाले आहेत.