Satara : पिपाणी चिन्ह कायमचे रद्द; शशिकांत शिंदे यांनी आयोगाचे मानले आभार
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे समाधान, चिन्ह रद्दीनंतर राजकारणात स्थिरता
एकंबे : राज्यातील बहुचर्चित सातारा लोकसभा मतदारसंघात पिपाणी उर्फ ट्रम्पेट या चिन्हामुळे पराभव पत्करावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. आयोगाने हे चिन्ह कायमचे रद्द केल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांनी 'उशिरा सुचलेलं शहाणपण अशा शब्दात प्रतिक्रिया देत आयोगाचे आभार मानले आहेत.
गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पिपाणी या चिन्हामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. अनेक मतदारांना पिपाणी आणि तत्सम चिन्हांमध्ये फरक ओळखता आला नाही, परिणामी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता ते चिन्ड कायमचे रद्द केल्याने पक्षातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, शेवटी, उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणावं लागेल. निवडणूक चिन्हातून पिपाणी उर्फ ट्रम्पेट हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. हा निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, आता आगामी निवडणुकीत चिन्हासंदर्भात कोणताही गोंधळ राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
... तर वेगळे चित्र दिसले असते
राजकीय वर्तुळात मात्र या निर्णयानंतर चर्चा रंगली आहे की, जर हा निर्णय काही महिन्यांपूर्वी झाला असता, तर सातारा लोकसभा निवडणुकीचे आणि महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरण आज वेगळं दिसलं असते. सातारा लोकसभा निवडणुकीत या चिन्हामुळे शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले.