निपाणीच्या हरितक्रांतीचा प्रणेता हरपला
माजी आमदार काका पाटील यांचे निधन : प्रदीर्घ आजारामुळे बेळगावात सुरू होते उपचार
निपाणी : गेल्या चार दशकांपासून निपाणी मतदारसंघाच्या राजकीय पटलावर चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे आणि तालुक्याच्या हरितक्रांतीला कारणीभूत असणारे लोकनेते माजी आमदार काका पाटील (वय 71 वर्षे) यांचे निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून बेळगावातील केएलई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता निपाणी येथे त्यांचे पार्थिव आणून येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवले. येथे हजारो समर्थक कार्यकर्ते व नागरिकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रा काढून वाळकी या त्यांच्या मूळगावी सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आमदार काका पाटील यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेले 40 दिवस बेळगावमधील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून तब्येतीमध्ये काही सुधारणा जाणवत नव्हती. रात्री दोन वाजता त्यांची तब्येत अचानक खालावली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
उपचार काळामध्ये त्यांना भेटण्यासाठी राजकीय, सामाजिक, सहकार, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची गर्दी झाली होती. 1977-78 मध्ये माजी आमदार दिवंगत रघुनाथराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काका पाटील व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. बीडीसी बँक संचालक, राज्य शिखर बँक संचालक, कणगले येथून जिल्हा पंचायत सदस्य असा प्रवास करताना 1994 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिंब्यावर अर्ज भरला. त्यानंतर 1999 मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. यावेळी ते पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत निवडून आले. 1999, 2004 आणि 2008 अशा सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला. 2013 मध्ये अचानक तब्येत खालावल्याने आणि राजकीय मुत्सद्दीपणा कमी पडल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. पराभव झाला तरी त्यांनी सर्वसामान्य माणसाशी असलेली नाळ कायम ठेवली. 2001 साली झालेल्या काळम्मावाडी करारामुळे निपाणी परिसराचा कायापालट झाला. परिसरात हरितक्रांती आणि औद्योगिक क्रांती घडून येण्यास हा करार कारणीभूत ठरला. 2007-08 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेमुळे गोठवलेला निपाणी मतदारसंघ पुन्हा अस्तित्वात आणण्यास काका पाटील यांचा संघर्ष कारणीभूत ठरला. यामुळेच तालुका निर्मिती होण्यास मदत झाली. डोंगरभागासह विविध ठिकाणी बहुग्राम पाणी योजना काका पाटील यांनी राबवल्या.
कर्नाटक व महाराष्ट्रातील नेत्यांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. यामुळेच आमदार अनेकदा महाराष्ट्र सरकारकडून निपाणीत निधी आणण्याची किमया काका पाटील यांनी साधली होती. राजकारणातील सर्व प्रकारची माहिती असणारा नेता म्हणून त्यांची वेगळी छाप होती. बुधवारी दुपारी निपाणीत मान्यवर व नागरिकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा काढली. पोलीस ठाणे, बेळगाव नाका, नगरपालिका कार्यालय मार्गे काँग्रेस कार्यालयाबाहेर मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला होता. तिथेही मतदारसंघातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर याच ट्रकमधून धर्मवीर संभाजीराजे चौक, चिक्कोडी रोड, महात्मा बसवेश्वर सर्कल, समाधीमठमार्गे पार्थिव पट्टणकुडी येथे आणण्यात आले. येथील ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर वाळकी येथे पार्थिव आल्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढली. येथे शोकसभेत मान्यवरांनी काकांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास येथील स्मशानभूमीतअंत्यसंस्कार करण्यात आले. चिरंजीव सुजय पाटील यांनी भडाग्नी दिला.
यावेळी माजी मंत्री रमेश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, माजी खासदार रमेश कत्ती, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, महांतेश कवटगीमठ, कल्लाप्पाण्णा मग्गेन्नावर, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, युवा नेते उत्तम पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, हालशुगरचे अध्यक्ष एम. पी. पाटील, माजी अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उद्योजक अभिनंदन पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, राजेंद्र वड्डर, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, दत्तकुमार पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, गॅरंटी अनुष्ठान योजनेचे अध्यक्ष रमेश जाधव, शंकरदादा पाटील, नगराध्यक्षा सोनल कोठडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती डॉ. जसराज गिरे, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, संकेश्वरचे माजी नगराध्यक्ष अमर नलवडे, श्रीकांत हातनुरी, जयप्रकाश सावंत, अजित पाटील बेनाडीकर, यांच्यासह मान्यवरांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, नीता बागडे, पुष्पाताई कुंभार, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, बाळासाहेब देसाई- सरकार, प्रदीप जाधव, डॉ. विनय निर्मळे, राजेंद्र वड्डर, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, राजू गुंदेशा, राजू पोवार, निरंजन पाटील -सरकार, रवींद्र कदम, सचिन खोत, बाबुराव खोत, यांच्यासह निपाणी मतदारसंघातील ग्रामपंचायत, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काका पाटील यांच्या पश्चात चिरंजीव सुजय पाटील, स्नुषा उमा पाटील, मुलगी सुप्रिया पाटील, जावई दत्तकुमार पाटील, नातवंडे यांच्यासह दोन भाऊ, तीन बहिणी, भावजय असा परिवार आहे. दरम्यान, सकाळी म्युनिसिपल हायस्कूल येथे दर्शनासाठी होणा-या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानेही बंदोबस्तए ठेवला होता. याठिकाणी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख श्रृती एस., प्रांताधिकारी सुभाष संपगावी, डीवायएसपी. जी. बी. गौडर, तहसीलदार एम एन बळीगार, सीपीआय बी.एस. तळवार यांनी भेट देऊन पाहणी केली.
निपाणीत उद्या शोकसभेचे आयोजन
माजी आमदार काका पाटील यांचे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त अवघा मतदारसंघ गहिवरला असल्याचे दिसत आहे. बुधवारी सायंकाळी वाळकी येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता निपाणीतील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.