महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मानव संबंध व्यवस्थापनातील शिखरपुरुष : रतन टाटा

06:27 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘माझा निर्णय स्पष्ट आहे. या देशाला वाहन पुरवठा करण्याचा करार या क्षणी रद्द झाला आहे. व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रात मानवीय पैलूंना व मूल्यांना मोठे स्थान आहे. शेकडो निरपराधांचे बळी घेत संपूर्ण मुंबईवर जीवघेणे बाँबहल्ले करणाऱ्या  पाकिस्तानला यापुढे टाटा समूहाकडून वाहन पुरवठा होणार नाही.’ रतन टाटांनी टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष म्हणून वरील रोखठोक निर्णय घेण्यामागे पार्श्वभूमी होती 26/11 रोजी मुंबईवर पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून झालेल्या भीषण हल्ल्याची.

Advertisement

काही तज्ञ-सहकाऱ्यांकडून वरील कथित निर्यात व्यवसायाचा करार असा रद्द केल्यास व्यावसायिक नुकसान तर होईलच, शिवाय मोठी नुकसान भरपाईपण द्यावी लागेल. रतन टाटा मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांच्या मते माझ्या देशाचे नागरिक आणि देशहित यापेक्षा माझा व्यवसाय मोठा थोडाच आहे? मला माझ्या देशवासीयांचा बळी घेणाऱ्यांबरोबर व्यवसाय करायचा नाही हे निश्चित.

Advertisement

26/11 च्या आंतकवाद्यांच्या बाँब हल्ल्यांमध्ये मुंबईच्या टाटा उद्योग समूहांतर्गत असणाऱ्या ‘ताज’ या पंचतारांकित हॉटेलवर आतंकवाद्यांनी धावा बोलल्यावर ‘ताज’च्या तीन कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मोठ्या संख्येत ग्राहक व विदेशी पाहुण्यांचे प्राण वाचविले होते. ‘ताज’वरील त्या हल्ल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच मुंबई भेटीत रतन टाटांनी आपले कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात विध्वंस व जाळपोळ झालेल्या ‘ताज’ हॉटेलला भेट दिल्यावर सुरुवातीला नमूद केलेला निर्णय घोषित केला व त्यावर ते ठाम राहिले.

केवळ व्यवसायातच नव्हे तर रतन टाटांनी सेवा व सामाजिक क्षेत्रातही अग्रणी स्वरुपाचे काम केले. विविध प्रकारे सामाजिक, शैक्षणिक व सेवा क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीशिवाय रतन टाटा यांनी खास भारतीय  विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण 28 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होत आहे. याशिवाय त्यांनी मुंबईच्या आयआयटीला 2014 मध्ये खास अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी 95 कोटींची देणगी दिली. दरवर्षी आपल्या कमाईतील विशिष्ट हिस्सा रतन टाटा धर्मादाय कामासाठी खर्च करीत असत व या साऱ्यामागे जनसामान्यांच्या हित आणि कल्याणाचीच भावना असे. रतन टाटांच्या वैयक्तिक कारकीर्दीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे त्यांनी 1961 मध्ये टाटा समुहाची प्रसिद्ध कंपनी टाटा स्टीलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत व स्वत:च्या हाताने काम केले. भारतीय उद्योग विश्वातील असे हे एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणावे लागेल.

त्यानंतर रतन टाटा 1975 मध्ये हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेले. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीही मिळविली. आर्थिकदृष्ट्या व जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात 1991 हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. त्याचदरम्यान देशात उदारीकरण व खासगीकरणाचे धोरण स्विकारण्याच्या पार्श्वभूमीवर रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या उद्योग समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली. 1990 ते 2012 पर्यंत ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत त्यांनी समूहाचे अध्यक्षपद भूषविले. त्याशिवाय ‘एअर इंडिया’चा त्यांनी आपल्या उद्योग साम्राज्यात समावेश करून आपला औद्योगिक वारसा जागतिक पातळीवर सुद्धा एका नव्या उंचीवर नेला.

रतन  टाटा यांच्या कारकीर्द व कार्यकाळातील परमोच्च टप्पा व घटना म्हणून त्यांच्या निवृत्तीचा उल्लेख करावा लागेल. उच्च पदस्यांची नियुक्ती कुणाचीही गाजते. मात्र यासंदर्भातपण रतन टाटांचे व्यवस्थापन वैशिष्ट्या म्हणजे त्यांची सर्वाधिक गाजलेली निवृत्ती. 2002 मध्ये वयाच्या 65 व्या वर्षी रतन टाटा निवृत्त होणार होते. मात्र कंपनीने त्यांना निवृत्त होण्याची परवानगी नाकारली. एवढेच नव्हे तर त्यानंतर तीन वर्षांनी कंपनी बोर्डाने त्यांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे राहील, असे जाहीर केले. ही त्यांच्या कामाची मोठीच पोचपावती म्हणायला हवी.

टाटा वाहन उद्योग क्षेत्रातील मोठ्या व महत्त्वाच्या निर्णयांवर रतन टाटांच्या मानवी मूल्यांच्या महात्म्याची छाप स्पष्टपणे दिसून येते. ‘टाटा सुमो’ हे त्यावेळच्या अत्यंत उपयुक्त व लोकप्रिय वाहनाला त्यांनी जोडलेले ‘सुमो’ हे नाव म्हणजे त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी व सुमो प्रकल्पावर आघाडीने काम करणाऱ्या सुमंत मुळगावकर यांच्या कामाची स्मृती चिरंतनपणे जपण्याचा प्रयत्न होता.

त्याचप्रमाणे टाटा इंजिन म्हणजे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची कार तर लाख रुपयात गरिबांनासुद्धा चारचाकी घेता यावी व चालविता यावी यासाठी वाहन उद्योगात नवे व्यावसायिक अर्थशास्त्र टाटांनीच रुजविले. प्रसंगी घाट्याचा सौदा केला पण गरिबांची कार देण्याचे आपले ब्रीदवाक्य त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. त्यामागे सर्वसामान्यांचा विचारच प्रामुख्याने त्यांनी केला. कंपनी, कंपनीचे कामकाज व कर्मचारी या साऱ्यांमध्ये सामंजस्यच नव्हे तर एकजिनसीपणा कसा असायला हवा याचे उदाहरणच रतन टाटा यांनी घालून दिले. त्यामुळे जमशेटपूरपासून पिंपरी-चिंचवडपर्यंतच्या कर्मचारी कुटुंबीय व त्यांच्या पिढ्या यांच्या जीवनात टाटा संस्कृतीला एक महत्त्वाचे व मानाचे स्थान कायमचे लाभले. आम्ही टाटा उद्योगात काम केले, आम्ही टाटा कॉलनीत राहिलो एवढेच नव्हे तर माझे शिक्षण टाटांच्या शाळेत झाले, असे सांगणाऱ्या पिढ्या सदोदित दिसतात. अशा पद्धतीने टाटांनी जपणूक केलेला मानवीय पैलू त्यांच्याच नव्हे तर भारतीय उद्योग क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरला.

रतन टाटांचे पुण्यावर विशेष प्रेम कायमस्वरुपी राहिले. याच कारणाने 28 डिसेंबर 2012 रोजी आपल्या कामकाजी कामातून निवृत्त होण्याच्या अखेरच्या दिवशी रतन टाटा यांनी पुणे येथील कर्मचाऱ्यांसह वेळ घालविला. याचे कारण म्हणजे टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे तत्कालीन अध्यक्ष विष्णू नवले यांनी टाटांना त्यांचा वाढदिवस कंपनी कर्मचाऱ्यांसह साजरा करण्याची विनंती केली व ती त्यांनी अशाप्रकारे मान्य केली हे सर्वांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहिले.

कर्मचारी संघटनेच्या संदर्भातदेखील रतन टाटा यांची अशीच मानवीय स्वरुपाची भूमिका होती. टाटा उद्योगांतर्गत टेल्को कामगार संघटनेचे लढाऊ नेते राजन नायर नमूद करतात की, टेल्कोमधील संघर्षानंतर 1989 मध्ये 20,000 कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या टाटा उद्योग संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून त्यांनी शनिवार वाड्यावर 11 दिवसांचे उपोषण केले. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पुणे, पिंपरी, चिंचवड परिसरातील उद्योग तीन दिवस सलग बंद होते.

यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेऊन रतन टाटा व राजन नायर यांच्यात चर्चा, बैठक घडवून आणली. त्यावेळी रतन टाटांनी समूह अध्यक्ष म्हणूनच नव्यानेच सूत्रे स्वीकारली होती. तरी त्यांनी राजन नायर आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकल्या व समजून घेतल्या. त्यांच्या बोलण्यात आम्हाला प्रामाणिकपणा दिसला व मुख्य म्हणजे त्यांनी चर्चेदरम्यान आमच्याशी आदरपूर्वक बोलणी केली, याचा उल्लेख राजन नायर आजही करतात.

या साऱ्या टप्प्यात राजन नायर यांच्याशी टाटा उद्योगाचे प्रसंगी तीव्र मतभेद होऊनही आजही राजन नायर यांच्या कार्यालयात रतन टाटांच्या छायाचित्राला स्थान आहे ते कायमस्वरुपी. व्यवस्थापन, कामगार संघटना संबंध यासंदर्भात पण वस्तुनिष्ठ भूमिका घेत रतन टाटांनी मानवीय मुल्यांची जपणूक केली. त्यामुळेच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पिंपरीतील सुमारे 1000 कामगार रात्रपाळी संपवून आवर्जुन गेले. रतन टाटांनी जपलेल्या मानवीय संबंधांचा परिचय त्यांच्या मरणानंतरदेखील अशाप्रकारे आला.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article