महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पिंक ऑक्टोबर’

11:59 AM Oct 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनीषा सुभेदार

Advertisement

ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा ‘पिंक ऑक्टोबर’ म्हणून आचरणात आणला जातो. एक स्तन काढला गेला तर आपली एक बाजू रिकामी अशी भावना त्या स्त्राrमध्ये बळावते. मात्र, असे मानण्याचे कारण नाही. ही रिकामी बाजू एका अनोख्या उपक्रमामुळे भरली जाते. ब्रेस्ट कॅन्सर आणि या उपक्रमाची माहिती प्रस्तुत लेखामध्ये...

Advertisement

 

कॅन्सर सर्जन डॉ. कुमार विंचूरकर.

ऑक्टोबर महिना हा ‘ब्रेस्ट कॅन्सर जागृती महिना’ म्हणून ओळखला जातो. या महिन्याचे महत्त्व अधोरेखित होण्यासाठी या महिन्याला ‘पिंक ऑक्टोबर’ असेही म्हटले जाते. अलीकडे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. याच अनुषंगाने केएलईचे ज्येष्ठ कॅन्सर सर्जन डॉ. कुमार विंचूरकर यांच्याशी साधलेला हा संवाद...

►ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे कोणती?

- खरे तर असे कोणतेही ठोस कारण सांगता येणार नाही. कधी कधी तो आनुवंशिक असू शकतो. परंतु, अलीकडच्या काळामध्ये आपली बैठी जीवनशैली, स्थूलत्व, गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन, विलंबाने झालेली गर्भधारणा, स्तनपान करण्याचे टाळणे, मद्यपान, धूम्रपान यामुळे हा रोग होण्याची शक्यता वाढते, हे मात्र नक्की.

►ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसे वयोमानसुद्धा अलीकडे आले आहे, याचे कारण काय?

- होय. लहान वयात ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी 30-40 या वयोगटातसुद्धा हा आजार बळावत चालला आहे. 24-25 वयाच्या तरुणीसुद्धा या आजाराने लक्ष्य केल्या आहेत. वर उल्लेख केलेलीच कारणे यासाठी लागू आहेत. तरुणींच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांच्यातील व्यसनाधीनता चिंताजनक आहे. त्यामुळे हे प्रमाण अलीकडे वाढले आहे.

►ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात लक्षात येते का? डॉक्टरांकडे कधी जावे?

- हो. महिला स्वत:च आपल्या स्तनाची तपासणी करू शकतात. मात्र, ती दररोज करायची नाही. महिन्यातून एकदा किंवा मासिक पाळी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी तपासणी करावी. ज्यांची पाळी बंद झाली असेल किंवा ज्या महिलांच्या गर्भाशयाची पिशवी काढण्यात आली आहे, अशा महिलांनी दर महिन्याच्या एक तारखेला स्वत:च आपल्या स्तनाची तपासणी करावी. आपल्याला काही फरक जाणवतो. एखादी गाठ जाणवते, असे वाटले तर डॉक्टरांकडे जायला हवे. मुख्य म्हणजे गाठ आढळली पण तिचा कोणताही त्रास नसेल, वेदना नसतील तर दुर्लक्ष करून चालणार नाही. हे जसे महत्त्वाचे तसेच प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असू शकते, असेही नाही. मात्र, जनरल सर्जन किंवा कॅन्सर सर्जनकडे जावे. बऱ्याचदा महिला गायनॉकोलॉजिस्टकडे (स्त्राrरोगतज्ञ) जातात. परंतु, कॅन्सर सर्जन किंवा अन्य सर्जनकडेच तपासणी करून घ्यायला हवी.

►लहान गाठ असेल तर पूर्ण स्तन काढायची गरज आहे का?

- खरे तर गरज नाही. पण छोटी गाठ असली तरी स्तन काढा, असा आग्रह महिलाच धरतात. वास्तविक गाठ बाजूला करून आपण स्तन वाचवू शकतो. मात्र, त्यानंतर रेडिएशन घ्यायला हवे. समजा, गाठ काढावी लागल्याने एका बाजूचा आकार लहान झाला तर दुसऱ्या स्तनाचा आकारही आँकोप्लास्टीद्वारे लहान करून समतोल राखता येतो.

►अशी गाठ आढळल्यास पुढच्या तपासण्या काय आहेत?

- गाठ मोठी असेल किंवा लहान, सर्वप्रथम काही प्राथमिक चाचण्या केल्या जातात व बायोप्सी केली जाते. बायोप्सी म्हणजे त्या भागाचा छोटा तुकडा काढून घेऊन त्याच तुकड्यावर रिसेप्टरची चाचणी केली जाते. हाताला न जाणवणारी गाठ मॅमोग्रॉफीद्वारे कळू शकते. स्तनांचे एक्स-रे म्हणजेच मॅमोग्रॉफी होय. गरजेनुसार सीटीस्कॅन आदी चाचण्या केल्या जातात.

►केमोथेरपीचा धसका अनेक जणी घेतात. याचे कारण काय?

- केमोथेरपी म्हणजे कॅन्सरविरुद्ध लढणारे औषध होय. याचा सर्वाधिक जाणवणारा दुष्परिणाम म्हणजे केस गळतात. परंतु, सहा महिन्यांनंतर केस पूर्ववत येतात. तथापि एकदा केस गळाले की आपण भेसूर दिसू किंवा केस परत येणार नाहीत, ही भावना महिलांमध्ये वाढीस लागते आणि त्यामुळे केमोथेरपीला त्या शक्यतो तयार नसतात. परंतु, उपचारांचाच तो एक आवश्यक भाग आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

►अशा स्त्राrचे आणि तिच्या कुटुंबीयांचे समुपदेशन किती महत्त्वाचे?

- सर्वप्रथम म्हणजे वास्तवाचा स्वीकार सर्वांनीच करायला हवा. पहिल्यांदा धक्का बसणे साहजिकच आहे. परंतु, त्यातून बाहेर येत जे आहे ते स्वीकारणे महत्त्वाचे. आता आपला काय उपयोग? असे महिलांनी मानण्याचे कारण नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिला या धक्क्यातून सावरण्यासाठी मदत केली पाहिजे. मुळात कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव दाखवता कामा नये. कॅन्सरग्रस्त महिलेला आपण नातवंडांसह खेळू शकतो का?, जेवू शकतो का? असे प्रश्न पडतात. कॅन्सर संसर्गजन्य निश्चितच नाही. त्यामुळे पुन्हा पूर्ववत त्यांचे जीवनमान राहू शकते.

►या निमित्ताने आपण कोणता संदेश द्याल?

- प्रथम म्हणजे महिन्यातून एकदा गाठ जाणवते का? ते तपासून पहा. सर्व गाठी कर्करोगाच्या नसतात, हे लक्षात घ्या. मात्र, हा निर्णय तुम्ही घेऊ नका. ते सर्जननाच ठरवू दे. वास्तवाचा स्वीकार करा. उपचार करून घ्या. पथ्य पाळा. आपण निरुपयोगी ठरलो, असे बिल्कुल मानू नका. ज्यांच्या कुटुंबामध्ये आजीला, आईला किंवा अन्य कोणाला कॅन्सर असेल तर त्या कुटुंबातील महिलांनी वर्षातून एकदा तपासणी करून घेणे आवश्यक आहे. एक्स-रे, सिटीस्कॅन याद्वारे अचूक निदान होऊ शकते. पण वयाची चाळीशी उलटली असेल तर एमआरआय करावा लागतो.

दिल से... दिल के करीब

मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे... माझी एक बाजू आता रिकामी झाली आहे... आता माझा काहीच उपयोग नाही... मी काही तरी पाप केले म्हणून असे झाले... आता मी समाजात कशी वावरू? कुटुंबीय मला पूर्वीसारखेच स्वीकारतील का..?

ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलेच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न उमटतात. हे वास्तव स्वीकारणे तिला इतके कठीण जाते की ती आत्मविश्वासच गमावून बसते. इतकेच नव्हे तर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपण आता निरुपयोगी, असे स्वत:च ठरविते. मात्र, कोणीही असे समजता कामा नये. रिकामी बाजू भरण्यासाठी ‘साईशा इंडिया फाऊंडेशन’ एक अभिनव उपक्रम राबवत अनेक महिलांच्या वेदनेवर फुंकर घालून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते आहे.

हा उपक्रम आहे ‘नॉकर्स’ तयार करण्याचा. म्हणजेच अत्यंत गुणवत्तापूर्ण अशी लोकर आणि फायबर यांच्या साहाय्याने नॉकर्स तयार करून ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना देण्यात येतात. ‘साईशा’चा हा उपक्रम पूर्णत: विनामूल्य आहे, हे सर्वात महत्त्वाचे. फार पूर्वीपासून ‘साईशा’शी जोडल्या गेलेल्या शुभा नायर यांनी बेळगावमध्ये हे काम सुरू केले आहे.

काय आहे हा उपक्रम? त्याची सुरुवात अशी झाली की, मुंबईच्या जयश्री रतन व त्यांचे पती कुमार अमेरिकेला गेल्यावेळी बार्बरा डेमॉरिस यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांनी तयार केलेले ‘नॉकर्स’ही पाहायला मिळाले. जयश्री मुंबईला परतल्या आणि त्यांनी हे ‘नॉकर्स’ तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्याची सुरुवात केली. शुभा त्यांच्या घरासमोरच राहत असल्याने सहजपणे त्या ‘साईशा’शी जोडल्या गेल्या. प्रारंभी फक्त सहा जणींनी सुरू केलेल्या या उपक्रमात आज पाचशेहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत.

या सर्व महिला लोकरीच्या साहाय्याने ‘नॉकर्स’ तयार करतात. आजपर्यंत 15 हजारहून अधिक महिलांना त्यांनी हे ‘नॉकर्स’ विनामूल्य दिले आहेत. याचे काम कसे चालते? या प्रश्नावर शुभा म्हणाल्या, दर बुधवारी आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण घेणारी स्त्राr अचूकपणे नॉकर तयार करू शकली तर ती ‘साईशा’मध्ये सहभागी होऊ शकते. साधारण एक ‘नॉकर’ अडीच तासांमध्ये तयार होतो. हॉस्पिटल्समध्ये तसेच मौखिक प्रचाराद्वारे ‘नॉकर्स’ची माहिती दिली जाते.

‘नॉकर्स’ हवे असल्यास ते कसे पाठविले जातात? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘साईशा’च्या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये सदर स्त्राrची पूर्ण माहिती आणि डॉक्टर व हॉस्पिटलचे नाव आणि फोन नमूद करणे आवश्यक आहे. फाऊंडेशनतर्फे याची खात्री केली जाते आणि त्यानंतर संबंधित स्त्राrला ‘नॉकर्स’ पोहोचविले जातात. कुरियरचा खर्चही संस्थाच उचलते. संस्थेत असलेल्या सर्व महिला स्वत:चे पैसे घालून हा उपक्रम राबवतात. ज्या स्त्राrचा एक स्तन काढला असेल तिला दोन ‘नॉकर्स’ व दोन्ही स्तन काढले असतील तर चार ‘नॉकर्स’ दिले जातात. हे ‘नॉकर्स’ धुता येतात आणि वापरता येतात.

पैशांशिवाय काहीच चालत नाही, अशा जगात हे काम विनामूल्य करण्यामागील भूमिका काय? या प्रश्नावर शुभा यांनी दिलेले उत्तर अर्थपूर्ण आहे. त्या म्हणतात,  एक अवयव गमावून त्या स्त्राrला रितेपण आलेले असते. या आजारादरम्यान ती केवळ वेदनांचाच नव्हे तर ताणतणावांचाही सामना करते. तिचा आत्मविश्वास गेलेला असतो. अशा वेळी आम्ही अत्यंत छोटी अशी भेट देऊन तिच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करतो. हे काम ईश्वरानेच आमच्याकडे दिले आहे, म्हणून ‘हमारे दिल से... किसी के दिल के करीब’ अशी आमची भावना आहे.

या प्रवासादरम्यानचा एखादा स्मरणीय अनुभव आहे का? असे विचारता 15 हजार महिलांचा वेगवेगळा अनुभव आहे. परंतु, ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या एका घरकाम करणाऱ्या महिलेला तिच्या कुटुंबीयांनी घराबाहेरचा रस्ता दाखविला. हे ‘नॉकर’ तिच्यापर्यंत पोहोचले. तिचा आत्मविश्वास परत आला आणि ती पूर्वीइतकीच सहजपणे आपले काम करत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा घरात घेतले. आमच्या कामाची यापेक्षा दुसरी पावती कोणती? असे शुभा म्हणतात. तेव्हा या कामामागील त्यांची आस्था प्रकर्षाने जाणवते.

बेळगावमध्ये हे ‘नॉकर्स’ ठेवण्यासाठी थोडी जागा त्यांनी अनेक प्रदर्शनाच्या आयोजकांकडे मागितली. परंतु, त्यांना नकार मिळाला. ज्योती कॉलेजच्या माजी प्राध्यापक डॉ. ज्योती मजुकर त्यांच्या बरोबर काम करत आहेत. प्रशिक्षण घेऊन त्यासुद्धा अनेक प्रकारचे ‘नॉकर’ तयार करत आहेत. हे काम सेवाभावी तत्त्वावर आणि विनामूल्य चालते. त्याचे महत्त्व ओळखून महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शुभा आणि ज्योती करतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article