बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ
वार्ताहर/सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी देवीच्या यात्रेला शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. दरम्यान दिवसभरात हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या आदल्या शुक्रवारी या यात्रेचे आयोजन केले जाते. येथील श्री चौंडेश्वरी देवी ही नवसाला पावणारी व जागृत देवी म्हणून प्रसिद्ध असल्याने यात्रेमध्ये हजारो भाविकांची उपस्थिती असते. तर दर मंगळवारी व दर शुक्रवारी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गर्दी असते. प्रारंभी मंदिरात हक्कदार पाटील मंडळी व भक्तांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला.
त्यानंतर विधिवत पूजा करून महाआरती म्हणण्यात आली. गावातील महिला आरत्या घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी देवीचा जयजयकार करण्यात येत होता. त्यानंतर दिवसभर ओटी भरण्यासाठी व नवस फेडण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. सध्या सुगी हंगाम सुरू असल्याने दिवसभर म्हणावी तेवढी गर्दी नव्हती. मात्र सायंकाळी सातनंतर भक्तांच्या गर्दीमध्ये वाढ झाली. रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात भक्तांची गर्दी होती. भक्तांना सोयीस्कररीत्या देवीचे दर्शन घेण्यासाठी देवस्थान कमिटीने सोय केली होती. तर दर्शन घेतलेल्या भक्तांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
आज होणार यात्रेची सांगता
सालाबादप्रमाणे होणाऱ्या श्री चौंडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त देवस्थान कमिटीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. तर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. यात्रेनिमित्त पेठ गल्लीमध्ये अनेक दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे बालचमूंसह भक्तांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. रात्री बारानंतर गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाला. शनिवार दि. 29 रोजी यात्रेची सांगता होणार आहे.