मध्यवर्ती बसस्थानकामध्ये कचऱ्याचे ढिग
मनपाकडून वेळच्यावेळी कचरा उठाव होत नसल्याची तक्रार
कोल्हापूर :
मध्यवर्ती बसस्थानक येथे कचऱ्याचा ढिग साचला आहे. बसस्थानकावरील संकलित कचरा एका ठिकाणी ठेवला जातो. महापालिकेकडून वेळच्या वेळी हा कचरा उठाव होत नसल्याची एसटी प्रशासनाची तक्रार आहे.
मध्यवर्ती बसस्थानक येथे रोज हजारो प्रवाशी प्रवासासाठी येतात. बसस्थानक येथे त्यांना कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र बकेट केल्या आहेत. तरीही काहींकडून बसस्थानकाच्या परिसरात कचरा टाकला जातो. याच्या स्वच्छतेसाठी एसटी प्रशासनाने स्वतंत्र ठेकदार नेमला आहे. त्यांचे कर्मचारी येथील कचरा संकलित करून एका ठिकाणी ठेवतात. हा कचरा महापालिकेचे टिपर चालक घेऊन झुम प्रकल्पाच्या ठिकाणी टाकतात. रोज टिपर चालक कचरा उठावासाठी येत नसल्याने या ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरत आहे. महापालिकेने सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात कचरा उठाव करण्याची मागणी एसटी प्रशासनाकडून होत आहे.